Friday, May 05, 2006

आंबा

आंबा म्हणले की आठवतो तो त्याचा मऊसूद केशरी रंग ... स्वत:तच मग्न असलेला आकार ... आणि उन्हाळा संपला तरी वर्षभर मागे रेंगाळणारी ती सुगंधीत चव.

एप्रिल महिन्याच्या तोंडाशी बाजारात जावं. तो चिरपरिचीत गोड वास हळूहळू वातावरणात भरू पाहात असतो.
'कसा दिला...?'
'काय फळ आहे पाहा तर खरं...'
'अस्सल रत्नागिरी आहे ताई ... '
'खराब निघाला तर तस्सा परत आणीन ...'
असे ठेवणीतले संवाद कानावर पडायला लागतात. आणि जशी काही बाजारात द्वाही फ़िरते...'आंबा आला'.

उन्हाचा कडाका वाढतो. मुलांचे परीक्षांचे निकाल लागून कानात वारं घुसल्यासारखे त्यांचे हुंदडणे सुरू होते. घराघरात कुठे कोठीच्या खोलीत, तर कुठे खाटेखाली पोते पांघरून गुपचूप एका रांगेत मांडलेले आंबे बाळगोपाळांना खुणावू लागतात. मग कुठे आईचा डोळा चुकवून किंवा दुपारी सगळे झोपल्यावर आंबा पळवून खाण्याचे उद्योग सुरू होतात.
खरेतर आंबा म्हणले की त्याच्याशी जोडलेल्या बालपणीच्या अशा कितीतरी आठवणी ताज्या होतात.

मला आठवते ... आमच्या प्राथमिक शाळकरी दिवसात आमची आई जास्त करून रायवळ, गोटीच आणायची. जास्तीत जास्त लाड म्हणजे पायरी. हापूस हा क्वचितच आणि तोही पाहुण्यांच्या निमित्ताने मिळायचा.

उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि आंब्यांचा मोसम सुरु झाला की मी आणि भाऊ, आमची अगदी गडबड सुरू व्हायची.
'आई ... आंबे कधी आणायचे? गल्लीत अमक्याकडे आणलेपण...'
शेवटी आमच्या रोजच्या कटकटीला वैतागून आई एकदाची म्हणायची, 'चला आणूया.'

तर तो सोन्याचा ... नव्हे आंब्याचा दिवस एकदाचा उगवायचा. सकाळी १० ते १०-३० ला बागेकडे भरणारया बाजारात जायला मी आणि भाऊ तयार व्हायचो. अशावेळी गल्लीतले खेळ, बाकी कुठलीही आमिषं, आणि मुख्य म्हणजे आपापसातली भांडणं सारं विसरून एकजुटीने आम्ही दोघे सर्वतोपरी आईला मदत करायचो. एकजण घरातली शक्य तेवढी मोठी पिशवी शोधून तर दुसरा आईला 'पुरेसे पैसे घेतलेत ना...' वगैरे खात्री करत, आईला पूर्ण भाव देत असे आम्ही बाजारात जायला निघायचो. आईदेखिल या दिवसात आमच्याकडून सुट्टीतला अभ्यास, अभ्यासाचे कप्पे आवरणं, कपडे घडी करणे वगैरे कामे करून घ्यायची.

बाजारात पोहोचले की खरी धमाल सुरू व्हायची. आई आधी भाजीपासून सुरुवात करायची. एरवी भाजीखरेदी च्या बाबतीत कटकट करणारे आम्ही तेव्हा मुकाट्याने आईच्या पाठीशी राहायचो. दगडाखाली हात असणे या परीक्षेत न समजलेल्या वाकप्रचाराचा अर्थ आता मात्र आम्हाला नीट उमजायचा. एक डोळा आंब्यांच्या हातगाड्यांकडे ठेवून आम्ही भाजीखरेदी करणारया आईच्या मागे-मागे फिरायचो. एरवी गर्दीत आम्ही हरवू याची काळजी घेणारया आईला आम्ही तिची पाठ सोडणार नाही याची अगदी खात्री असायची.
तोवर गल्लीतले कोणी दोस्त मंडळ आपल्या आयांबरोबर जर भेटले तर भाऊ त्यांना तत्परतेनं सांगायचा 'आम्ही आंबे घ्यायला आलोय.' मग आम्ही दोघे आगाऊपणाने आंब्याचे भावपण विचारून यायचो. शेवटी एकदाचा एक आंबेवाला गाठून भाव करणे चालू व्हायचे. आईच्या दृष्टीने सगळेच आंबेवाले भाव जास्त सांगत असायचे. तर आम्हाला वाटायचं - काय ही आई? एवढं स्वस्त कोणी देईल का? जशी आई भाव विचारून पुढे पुढे जायची तशी आमची सहनशक्ती संपत जायची. भाऊ आणि मी एरवी दुश्मन, पण तेव्हा मात्र हातात हात घालून एकमेकांकड़े केविलवाणे पाहायचो.
'आई, अगं घे ना...किती कमी करतोय तो...' आम्ही अगदी टेकीला आलेलो असायचो.
'तुम्ही गप्प बसा...पुढे बघू...आणि मधे-मधे बोलू नका' - आई आमच्या सहनशीलतेवर अज़ून एक घाव घालायची.

आम्हाला मनातून प्रचंड भिती वाटायची की आईनं आंबे घेतलेच नाहीत तर... या विचारासरशी सारी सुट्टीच व्यर्थ वाटू लागायची.

शेवटी एकदाचे हव्या त्या भावात आई आंबे मिळवायचीच. आम्हा भावंडांचा जीव एकदाचा आंब्यात पडायचा. माझी आणि भावाची आता ती टोपली उचलण्याची धावपळ चालू व्हायची. आम्हा दोघांना बाजूला सारून शेवटी ते गोड ओझं आईच उचलायची. आम्ही महाराजांच्या भालदार-चोपदारा सारखे पुढे-मागे चालत घरी यायचो.

तर असे एकदाचे आमच्या घरात आंबे यायचे. आईने घरात पाऊल टाकून टोपली खाली ठेवली की लगेच आम्ही खायच्या तयारीला लागायचो.
पण आई हातातून आंबा काढून आधी देवापुढे ठेवायची. देवाला दिवा लावायची, हात जोडायची आणि प्रार्थना म्हणायची.
आमचं लक्ष्य मात्र आंबा हेच असायचं. 'जोडा हात ... लक्ष कुठयं?' आई ओरडायची.

आंब्याचा रस काढणे हादेखील एक मोठासा कार्यक्रमच असायचा.

सुट्टीला गावी आजीकडे गेलो की मामा पोत्यातून शेकड्यावर आंबे आणायचा. आजी मोठ्ठ्सं पातेलं समोर घेऊन आंबे पिळायला बसायची. आम्ही मामे-मावस भावंडं तिच्याभोवती गोलाकार बसायचो. आंब्याचा रस काढला की त्याची कोय आजी एकेकाला चोखायला दयायची. आम्ही सर्व आशाळभूतासारखे आपल्याला कोय कधी मिळणार याची वाट बघत बसायचो.

दुपारी भरपूर रस ओरपून, परत संध्याकाळचं ओटीवर बसून गोटी आंबे चोखणे आणि साली पलीकडच्या वाड्यात फेकणे अशी सगळी रसाळ सुट्टी असायची. पण तरीही आजी रस काढायला बसली की त्या कोयींमध्ये मात्र जीव अडकायचाच.

आता बाजारात आंबा आला की लगेच घरात टेबलवर पण येतो. रायवळ, गोटी सोडा, पायरीपण आणला जात नाही. हापूस शिवाय आमचं जसं पानच हलत नाही.

तरीही दरवर्षी पहिला आंबा आणला की आठवणीतला हा आंबा नव्यानं मोहोरतो. आपल्या मुलांसाठी आंबा आणताना बालपणीतला हा आंबा हळूच खुणावतो. बालपणाची आणि आंब्यातल्या भागीदार भावाची आवर्जून आठवण येते.

बालपणातला तो रायवळ ... ते चोखताना कोपरयापर्यंत गेलेले ओघळ ... आम्हाला 'आंब्यावर बसलेत अगदी' म्हणून ओरडणारी आई ... आठवणीतला तो आंबा अधिक मधूर वाटतो. वर्षागणिक त्याची रसाळ गोडी जशी वाढतच जाते.

- सोनाली सुहास बेंद्रे