Tuesday, January 25, 2011

एक दिवस

सकाळी सकाळी ६ वाजता गाढ साखरझोपेतून उठवत असताना तिच्या छोट्याशा हातांनी तिने माझा हात घट्ट धरून ठेवला. "माझ्याजवळ बस ना ५ मिनिटं! कालची ती गोष्ट सांग ना गं ..."
पण मी मात्र तिला तसंच अर्ध्या झोपेतून उचललं आणि सरळ नेऊन पॉटीवर  ठेवलं. "चला आवरा आता. गोष्ट वगैरे काही नाही." तिचा चेहरा अगदी बारीक झाला. पेंगणाऱ्या तिला तसंच ठेवून मी माझ्या कामाला लागले.
"सकाळच्या गडबडीत गोष्टी काय सांगायच्या? आवरायचं सोडून काय बसून राहायचं का? एवढं कळायला नको का आता रोजच्या सवयीनं? ६ वर्षाची झाली की ती आता!"
तिचं आवरणं, शाळेची तयारी, डबा... घडयाळाच्या काट्याबरोबर माझं तोंडही चालू झालं. खरं तर तिच्या उशिरा उठण्यामुळे माझ्या वेळापत्रकाचे कसे १२ वाजलेत हे काही तिला सांगून कळणार होतं का?
तिला अजून घडयाळ कळत नाही हे माहीत असूनही नेहमीप्रमाणे मी धाक घातला, "ते बघ, तो मोठा काटा ८ वर येईपर्यंत दूध संपलं पाहिजे, काय?"
रिक्शावाले काका आले म्हणताच तिची धांदल उडाली. अंगापेक्षा बोंगा जास्त असलेलं शाळेचं दप्तर, टिफ़िन बॅग, पाळणाघराची बॅग असा दिवसभराचा संसार घेउन सकाळी पावणे-सातला ती निघालीदेखील. तिला शाळेच्या रिक्शामध्ये बसवताना, तिच्या हातातून माझा हात सोडवताना जाणवलंच की आता आपण थेट संध्याकाळीच भेटणार. क्षणभरच... पण मग लगेच पुढचा दिवस समोर दिसू लागला. मिटींग्जची एकामागून एक असलेली रांग, वाट पाहात असलेले निर्णय, कामांची न संपणारी मोठ्ठी यादी ...
सुपरवूमन असल्याच्या नादात दिवसभरात कामाचा अगदी फ़डशा पाडला. मिटींग्ज रंगल्या, सगळेच नाही पण कितीतरी निर्णय मार्गी लागले. लंच अवरमध्ये  नेहमीप्रमाणे विषय निघाले, मूल, अभ्यास, घर, ऑफिस कसं संभाळायचं हे सगळं?

"जमतं तसं सवयीनं, एकदा त्यात पडलं की मग काय?" मी हसून म्हणलं. हे बोलताना आत जाणवलेली बोच मी अगदी सराईतपणे लपवली.
दुपारी बोलावून बॉसने status विचारलं, कौतुकही केलं. कौतुकाच्या त्या नशेत २ नवीन जबाबदाऱ्या मी हसतच स्वीकारल्या. पुढचा दिवस कसा संपला काही कळलंच नाही.
आजूबाजूच्या मंडळींची चहा सिग्रेटला जाण्याची गडबड सुरू झाली तशी मी भानावर आले. घरचे वेध लागले. तिचा चेहरा डोळ्यापुढे येऊ लागला.
संध्याकाळच्या साडेसहाच्या बंपर टू बंपर ट्रॅफिकमधून एकीकडे सावकाश पण तरीही वेगात गाडी हाकताना वेळेचा अंदाज चुकल्याचं लक्षात येऊ लागलं. उशीर होऊ लागला तशी माझी घालमेल सुरू झाली. मग कोणी तिला घेऊ शकेल का याचे फोन सुरू झाले. नवरा, नातेवाईक, मैत्रिणी कोणालाच जमत नाही म्हणल्यावर सरळ पाळणाघरात फोन लावला. सगळी मुलं गेली आहेत, लवकर या हे ऐकून पोटात गोळा आला.
पाळणाघराच्या रिकाम्या अंगणात वॊचमन काकांबरोबर तोंड पाडून उभी असलेली एकटी ती मला दिसू लागली. उद्यापासून १० मिनिटं लवकरच निघायचं, मी परत एकदा निश्चय केला.

गाडीत बसल्या बसल्या तिने हुकूम सोडला, "ए घरी नाही ग जायचं... मला फ़िरायचंय तुझ्याबरोबर. आपण मज्जा करू. घरी गेलं की तू लगेच काम करत बसतेस. मग मला नाही आवडत ते."
झालं, मगाचा तिला भेटण्याआधीचा तो माझा दाटलेपणा कुठे गायबच झाला. "घरी चला, रविवारी बसू फ़िरत." मी दामटून तिला घरी आणलं.
घरात आल्या आल्या तिने माझ्यासाठी आणलेल्या गंमती दाखवायला सुरुवात केली. चॉकलेटची  चांदी, एक-दोन दगड, पाळणाघराच्या वाळूत सापडलेल्या बिया, सगळा खजिना तिनं माझ्यासमोर रिकामा केला. तोंडावर अगदी कुबेराचं धन लुटून आणल्याचा अविर्भाव. "पाहिलंस तुझ्यासाठी आहे." मी मोठ्या कृतज्ञेतेने तिच्याकडे पाहिले. "Thank you, मला इतक्या छान गंमती कधीच कोणी आणल्या नव्हत्या!... बरं आता होमवर्क  करुयात का?"
पुढच्या एक-दिड तासात थोडं गोडीनं - थोडं रागावून अभ्यास घेणं, धाक दाखवणं, वळण लावणं, जेवू घालणं अशी सगळी कामं मी efficiently उरकली. तिला T.V. पुढे बसवलं आणि माझा conference call चालू झाला. पण आज तिला T.V. नकोच होता. मग माझा फोनवर mute-unmute चा खेळ चालू झाला. तिला मध्येच येऊन काही सांगायचं होतं, स्वत: काढलेली चित्र दाखवायची होती. पण तिला कळलं बहुतेक की आईला आत्ताही वेळ नाही. माझा पुढचा call शांतपणे पार पडला.
तोवर ती पेंगुळली होती. बाजूला मगाची चित्रं, थोडे खडू पडले होते. माझ्यासाठी आणलेल्या टिकल्या, चांदया मी हरवू नये म्हणून एका डबीत भरून ती डबी माझ्या बॅगेत टाकली होती.
मी तिला जवळ घेतलं. अतिशय आसुसून ती माझ्या कुशीत शिरली. तिच्या चिमुकल्या हातांनी तिनं मला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यातून गरम पाणी तिच्या केसात पडलं. स्वत:चं आवडतं काम करायची धडपड, त्यापायी होणारी दगदग,तिची दिवसातून १० वेळा तरी होणारी आठवण, सतत सोबत करणारी काळजी आणि अपराधीपणा, सगळं अगदी साचून आलं.
बास. फ़ार झालं. आता ब्रेक घ्यायचा, आणि फ़क्त तिला वेळ दयायचा. हीच तर वर्ष आहेत. नंतर कदाचित तिला माझी गरजही उरणार नाही. बास... आता हा प्रोजेक्ट संपला की सांगून टाकायचं. मी परत एकदा ठरवलं... नेहमीप्रमाणेच.
मग अपराधीपणा जरा कमी झाला. पुढच्या दिवशीच्या कामांच्या विचारात मन बुडून गेलं. कधी डोळा लागला कळलंच नाही. जाग आली तेव्हा दुसरा दिवस सुरू झाला होता.

- सोनाली सुहास बेंद्रे