Sunday, January 11, 2015

आजी आजोबा

सोसायटी मधल्या कट्ट्यावर एक आजी व आजोबांची जोडी रोज बसलेली असायची. आजोबा नव्वद च्या पुढचे आणि आजी देखील  मागोमाग असाव्यात. दोघेही उंचेपुरे आणि गोरेपान होते. आजोबांच्या अंगावर नेहमी पांढरा शुभ्र सदरा-पायजमा आणि बारा महिने स्वेटर मफलर असायचा. डोक्यावर खादीची टोपी असायची. तर आजीही नाजूक फुलांच्या पांढर्‍या स्वच्छ साडीत प्रसन्न वाटायच्या. त्यांचा संसार खूप आनंदात आणि समाधानाने  वाटचाल झालेला वाटायचा .

उन्ह उतरली की दोघेही सावकाशीने चालत घरातून निघायचे. आजोबा हातातील काठी टेकत, रोजच्याच पायाखालच्या रस्त्याचा नव्याने अंदाज घ्यायचे. तर खांद्यावरून पदर घेतलेल्या आजी सावलीसारख्या आजोबांच्या मागून निवांत चालत असायच्या. रस्त्याचा आणि गाड्यांचा अंदाज घेण्याची जबाबदारी आजोबांची असावी. लांबून येणारी गाडी दिसली की आजोबा आधी आडवा हात करून आजीला थांबवायचे. मग दोघे एकमेकांचा हात धरून कडेला उभे राहायचे. गाडी जाइतोवर लुकलुकत्या डोळ्यांनी पहात राहायचे. गाडी गेली की परत जोडी पुढे निघायची. जवळपास पाव किलोमीटरवर असलेला कट्टा गाठायला त्यांना अशाने बर्‍यापैकी वेळ लागत असावा.
पण तिथे येउन बसणे हा त्यांचा मोठाच विरंगुळा असावा. येणाऱ्या जाणाऱ्या  बरोबर  कधी गप्पा, मुलांचे खेळ बघणे यात ते रंगून जायचे.

रोज संध्याकाळी घरी जाताना त्या दोघांना तिथे बघण्याची मला आणि माझ्या लेकीलाही सवय झाली होती. ती रोज त्यांना हात करायची. कधीतरी आजोबाही त्यांचा थरथरता हात थोडा वर घ्यायचे. एकदा मात्र आम्ही आवर्जून त्यांच्याजवळ गेलो. प्रत्यक्षात ओळख नसल्यामुळे  असेल कदाचित पण आजोबा जरा गोंधळले. गाडी आल्यावर ते धरत तसा  त्यांनी आजींपुढे हात धरला आणि स्वतः पुढे झाले. जाड गोल चष्म्या मागच्या लुकलुकत्या  डोळ्यात प्रश्न होता - तू कोण? सुरकुत्यांच्या भारामुळे वाकलेल्या त्यांच्या हातामागे आजी अगदी  सुरक्षित व मजेत बसल्या होत्या. मला एकाचवेळी गंमतही वाटली आणि लहान मुलांविषयी वाटावी तशी मायाही. "आम्ही रोज तुम्हाला या वेळी पाहतो. मी याच सोसायटीत राहते." असं मी म्हणल्यावर
ते छान मोकळेपणाने हसले. माझ्या लेकीशी ते बोलत असताना मी त्यांना निरखून बघत होते. लक्ष्मी   नारायणाचा जोडा म्हणतात तो असाच काहीसा असावा असं काहीसं वाटत होतं.
त्यानंतर मात्र आम्ही कट्ट्या पाशी गाडी हळू करू लागलो. आजोबा आजीना हात करून त्यांचा हात वर दिसला की मग पुढे जाऊ लागलो.

पुढे काही दिवस कट्टा रिकामा दिसायचा. वेळ पुढे मागे होत असेल म्हणून जरा दुर्लक्ष केलं . पण मग राहवलं नाही तसं त्यांच्या घरी जाउन चौकशी केली. कळलं की ते काही दिवस दुसर्‍या  लेकाकडे गेले आहेत. येता जाता चुकल्या सारखं वाटत राहायचं.
शेवटी परवा एकदाचे आजोबा कट्ट्यावर दिसले. स्वेटर मफलर घालून एकटेच बसले होते. त्यांना एकटे पाहून चुकल्यासारखे वाटले . मनातले वाईट विचार बाजूला सारत जवळ जावून त्यांना विचारलं " किती दिवसांनी दिसताय ... आणि आजी कुठे आहेत ?" काही सेकंदानंतर ओळख पटली असावी असं वाटलं. म्हणाले - "तिची तब्बेत ठीक नसते जरा . चालवत नाही आता . बाहेर पडतच नाही ती एवढ्यात . मग मी एकटाच येतो ." मग थोडं थांबून म्हणाले "चालायचंच ... आता पुढे मागे व्हायचंच ."
मला हुरहूर लागून राहिली . लक्ष्मी शिवाय बसलेला नारायण एकटा वाटू लागला.

आता गाडीवरुन जाताना कधी हात केला तरी थांबून आजींची चौकशी करावी असं वाटत नाही . अज्ञानात सुख असावं असं वाटतं . मी स्वतःला सांगते की  आता आजोबा इथे एकटेच बसले असले तरी आजी घरी मुलां -नातवंडा बरोबर उबेत बसल्या असतील . संध्याकाळ गडद झाली की आजोबा सावकाश काठी टेकत घरी जातील आणि आजींच्या सोबतीने रमून जातील . हे सगळं असंच राहील .

- सोनाली सुहास बेंद्रे