Tuesday, March 22, 2016

देवदर्शन

आम्ही कोल्हापूरला पोहोचलो तेव्हा सारे कोल्हापूर जवळजवळ झोपले होते. रात्रीचे १२ वाजायला आले होते. एरवी भरल्या दुकानांनी, माणसांनी गजबजलेले छोटेसे वाटणारे रस्ते आता अगदी प्रशस्त वाटत होते. खरंतर परिचयाचे पण आत्ता ओळखीच्या खुणा शोधण्याचे आमंत्रण देणारे असे काहीसे वाटत होते. २ -३ जागा पाहून झाल्यावर आमच्या १२-१५ जणांच्या ग्रुपला देवळाच्या अगदी मागेच राहायला जागा मिळाली. प्रवासाने आखडलेली सर्वजण पाय पसरून निवांत झाली. मुलांचा दंगा सुरू झाला तर आज्यांनी पाय पसरून गप्पा जमवल्या. जसे काही रात्रीचे १२ नाही तर सकाळच होऊ घातली आहे. गंमत म्हणजे त्या लॉजचा मालकही अगदी निवांत वाटत होता. त्याला दिवसभरात आत्ता कुठे उसंत मिळाली असावी असं दिसत होतं. आम्ही त्याला विचारले "सकाळी किती वाजता जावे म्हणजे काकडारती मिळेल?" "४ वाजता जा. सुरेख दर्शन होईल." तो म्हणाला. "पण बायकांना अगदी आत परवानगी नाही बरंका!"

आम्ही त्या सकाळी जोतिबाच्या डोंगरावर जाऊन आलो होतो. मला तेथील आठवण झाली.

जोतिबाचा भला लांब पसरलेला दर्शनमार्ग पार करून आम्ही गाभाऱ्याच्या जवळपास आलो होतो. गुलाबी रंगात रंगलेली गर्दी जोतिबाच्या नावाने चांगभलं करत होती. आयाबाया एकमेकींशी गप्पा मारत एका बाजूस निवांत चालणाऱ्या पोरांना ओरडून पुढे ढकलत होत्या. गुलबक्षी रंगात सारा परिसर रंगून गेला होता. देवळाच्या काळ्या दगडांवर, उंच गेलेल्या काळ्या कळसावर, झाडांच्या पानांवर, हातातल्या फुलांवर सगळीकडे जसा एक गुलाबी उत्सव मांडला होता.
देवळाच्या मुख्य गाभाऱ्यात आल्यावर आम्हा बायकांना मागेच थांबवण्यात आले. आमचे नवरे, दीर, मुलगे पुजारयाबरोबर देवाच्या पुढ्यात गेले. मी, माझ्या जावा, सासवा, मुली आमच्या घरातल्या पुरुषांचे कपडे, पाकिटे वगैरे संभाळत मागच्या चौकात उभ्या राहिलो. मघाच्या रांगेतल्या नऊवारीतल्या बायका माझ्या बाजूला उभ्या होत्या. मधल्या गर्दीमुळे हरवलेल्या, न दिसणाऱ्या मूर्तीला त्या मनोभावे नमस्कार करत होत्या. चुकारपणे मागे राहिलेल्या मुलाला पुढे ढकलत होत्या आणि त्यांच्या छोट्या बहिणींना हाताने मागे ओढत होत्या.
"तुमचे फुडे गेले वाटतं" माझ्या बाजूची बाई मला विचारत होती. ती आणि मी दोघीही आमच्या आमच्या धन्यांचे कपडे संभाळत आणि पोरा बाळांना सावरत गर्दीतून पुढचे काही दिसतंय का ते पाहात होतो. मला खरंतर जोतिबाची ती मूर्ती जवळून पाहायची होती. घोड्यावर स्वार झालेल्या त्या रेखीव, रुबाबदार मूर्तीला पुढ्यातून न्याहाळायचे होते. लाल मखमली अंगरखा आणि डोक्याला जरतारी पागोटे घातलेला काळ्या दगडातला तो रांगडा देव जसा लग्नास निघालेला नवरदेवच वाटत होता. माझी छोटी बाबाबरोबर पुढे जायला न मिळाल्यामुळे हिरमुसली होती. तिला उचलून दाखवत मी म्हणले होते, "अगं बघ की बाप्पा पण आपल्याकडेच बघतोय घोड्यावर बसून." आम्हा दोघींना या कल्पनेने खुद्कन हसू आले होते.

आणि आत्ता कोल्हापुरातला हा लॉजचा ME Structural Engineer असलेला मालक आम्हाला सांगत होता, "अहो सगळे कसे ठीक चालू होते. पण दोनेक वर्षापूर्वी या बायांना काय सुचले काय माहीत. सगळी बंधने तोडून गाभाऱ्यात घुसल्या. स्त्रीमुक्तीच्या नावाखाली गोंधळ नुसता! आपल्या संस्कृतीच्या विरोधात जावेच कशाला? ज्याने त्याने आपापले नेमून दिलेले काम करावे. हे असले वागणे म्हणजे देवीच्या कोपाला निमंत्रणच, नाही का?" त्याने आम्हालाच विचारले. रात्री १२ वाजता त्यांच्याच लॉज मध्ये बसून मान डोलावण्याखेरीज आम्ही दुसरे काय करू शकणार होतो?

दुसरा दिवस पहाटे ३-३० लाच सुरू झाला. खूपच कमी भाविक असल्यामुळे आम्हाला बसायला छान जागा मिळाली. देवीच्या मूर्तीचा अभिषेक चालू होता. पहाटेच्या त्या शांत वातावरणात पुजार्यांच्या मंत्राचाच काय तो एक आवाज होता. दूधापाण्याच्या अभिषेकात न्हाऊन निघणारी ती मूर्ती आधी तर अनोळखीच वाटत होती. आतापर्यंत शालू-शेल्यांत सजलेली, दागिन्यांनी मढलेली देवीच पाहिली होती. याआधी स्त्रीसुलभ भावनेने नेहमी देवीचा शालू आणि पारंपरिक दागिने याकडे निरखून पाहिले होते. देवीला नमस्कार करताना लहानपणापासून मोठ्यांनी देव दिसला की नमस्कार करण्याची दिलेली शिकवण, देवीची भक्ती आणि कोप यावर वाचलेले साहित्य आदीचा प्रभाव असायचा. त्यामुळे नमस्कारास एक धाकाची किंवा एक कर्तव्य केल्याची किनार असायची. पण आजचे देवीचे हे रूप काही वेगळीच होते. मुख्य पूजे आधीची साडी नेसून तयार होणारी, अजून फारशी सजावट न केलेली ती देवी अगदी आपल्यातली वाटत होती.
लहानपणी सकाळच्या झोपेची गुंगी डोळ्यावर असताना नुकतीच अंघोळ केलेली आई पूजा करता करता उठवायला यायची. तिचे धुतलेले केस तिने वर बांधलेले असायचे. ती जवळ आली की तिच्या साडीचा धुवट वास मन भरून टाकायचा. मायेने डोक्यावरून हात फिरवत ती एक श्लोक म्हणायची. "हिमनगनंदिनी त्रिपुरसुंदरी, हेरंबजननी अंतरी... " खूप प्रसन्न जाग यायची.
समोरची देवी तशीच वाटत होती - पहाटेच्या सुस्नात आईसारखी.

हळूहळू देवळात गर्दी वाढू लागली होती. देवीची मूर्ती फुलादागिन्यांनी सजू लागली होती. रांगेकडे लक्ष ठेवणारे देवळातले लोक गर्दीला पुढे ढकलत होते. कोणी भाविक तेवढ्या गर्दीत साष्टांग नमस्कार घालत होते. बाया मुलांची डोकी टेकवत होत्या. देवीची ओटी भरत होत्या. पुजारी देवीपुढे रेंगाळणाऱ्या बायकांना ओरडून पुढे जायला सांगत होते. आता देवीचा गाभारा पुजारयांनी पूर्ण भरला होता. देवळातला एक बुवा येऊन आम्हाला खेकसून बाहेर जायला सांगत होता. त्या ठिकाणी बसण्याची सवलत बहुतेक आता संपली होती. निमूटपणे बायका मागच्या मंडपात जात होत्या.
लौकिक असा नमस्कार न करताच मी देवळाच्या बाहेर आले होते. पहाटेच्या वेळी मिळालेल्या त्या सुंदर अनुभवानंतर आता कुठल्या सोपस्काराची गरजही वाटत नव्हती. आम्ही सगळे देवळाच्या बाहेर पडलो. गप्पांना सुरुवात झाली. सकाळी सकाळीच देवळाबाहेर एक जख्ख म्हातारी आशेने येणारया जाणारयाकडे पहात होती. तिला प्रेमाने तिचे देणे देऊन आम्ही तलावाकडे चालू लागलो होतो.

- सोनाली सुहास बेंद्रे