Tuesday, February 28, 2006

क्षण

घट्ट मिटल्या मुठीमधले काही क्षण वेचलेले
काही निसटले, सांडलेले, दूर मागे राहिलेले

'अभिनव'च्या रंगांमधले कुंचल्यातून आकारणारे
कपांवरच्या वाफेवरती शब्दांसवे तरंगणारे

कल्पनांच्या वाटेवरचे सृजनोत्सवात जागलेले
मोरपंखी दिवसांमधले मैत्रच होऊन राहिलेले

काही क्षण हातावरच्या मेंदीत रंगून गेलेले
अक्षतांसवे उधळताना हिरवे हिरवे किणकिणले

मिळून पाहिल्या स्वप्नांचे, संकल्पांचे, आकांक्षांचे
कष्टसाध्य आनंदाचे घामामधूनी ओथंबले

आस लावूनी वाट पाहिली ते क्षण माझ्या कुशीत फुलले
दिसामाशी जे मोठे होऊन आनंदाचे निधान झाले

चिऊकाऊच्या गोष्टींमधले चांदोबाच्या वाडीमधले
चिमण्या बोलांमध्ये गुंतूनी माझ्या घरटी विसावले

मागे पाहता वळूनी कैकदा वाटे क्षण ते पकडावे
बंद मखमली पेटीमध्ये हळूच जपावे सजवावे

येतील क्षण संघर्षाचे, थकलेले, गेले दमूनी
पेटीतल्या या क्षण ठेव्यांची करूनी मग ती संजीवनी
अनुभवल्या त्या पूर्वक्षणांची परतूनी जादू अनुभवावी
थकलेल्या तनूमनास व्यापून नवी उभारी मिळवावी...


- सोनाली सुहास बेंद्रे 

Wednesday, February 15, 2006

बालसंगोपनाचे तीन प्रसंग

कृष्णा आणि यश दिवसभर एकत्रच असतात ... आजीकडे.
यश म्हणजे माझा भाचा .. वय वर्षं तीन
आणि कृष्णा म्हणजे माझी कन्या .. वय वर्षं दीड.
यशला रामायण अगदी तोंडपाठ आहे. म्हणजे जर त्याला कोणीही राम या विषयावर 'चावी' मारली तर त्याची लगेचच टकळी चालू होते. त्याच्या या खेळात घरातल्या सगळ्यांनाच विविध भूमिका निभवायला लागतात.
म्हणजे तो कायम 'राम'च असतो आणि बाकीचे त्याच्या इच्छेनुसार लक्ष्मण, सीता, सुग्रीव, वाली, हनुमान अगदी रावण, त्राटीका आणि शूर्पणखा सुध्दा.
तर परवा काय झालं ... एकत्र खेळताना यशनं जोरात कृष्णाच्या नाकाखाली बोट घासलं. सुरीनं कापावं तसं. आणि तो पडद्यामागं जाऊन लपला. कृष्णा नाक धरून आजीकडे गेली आणि तिचा पदर ओढून सांगू लागली, 'दादा..बाऊ...'
आपल्या नातवंडांच्या गुणांशी चांगलीच परिचीत असलेली आजी आधी यशला शोधू लागली.
पडद्यामागच्या यशला पुढे घेत म्हणाली, 'काय रे काय केलंस तिला?'
'काही नाही गं' .. यश.
'खरं सांग यश .. काय केलंस ..?' .. आजी.
'अगं आजी .. मी ना शूर्पणखेचं नाकच कापलं' .. यश.
यापुढं बोलण्यासारखं असं आजीकडं काहीच नव्हतं.

-------------------------------

रोज सकाळी आमचा आणि कृष्णाचा ठरलेला कार्यक्रम असतो.
'दातु' घासणे, मग गरम पाणी पिणे आणि मग ४-५ मनुका खाणे. तर आज हे सर्व पार पडल्यावर खाऊ खायची वेळ झाली. मला आपलं वाटलं की खाऊमध्ये शिरा आहे तर जरा देवाला नैवेद्य दाखवावा.
खाऊचा वास लागून कृष्णाबाई वाटी-चमचा घेउन तयारीतच उभ्या होत्या. तिची ओट्याशी उभं राहून, टाचा उंच करकरून हाताशी काही लागतंय का याची धडपड चालू होती.
कसंबसं रोखून मी तिला म्हणलं, 'आधी बाप्पाला देउयात का?'
झालं. ही माझ्यापुढे .. थेट देवापुढे हजर.
मी नैवेद्याची वाटी भरून तिथवर जाईपर्यंत हीनं आमचा मोठा बाळकृष्ण बाहेर काढला होता. त्याच्या मोठ्या आकारामुळे तो तिचा अधीक आवडता देव आहे. तर तिच्या दातांचा छोटासा ब्रश घेउन ती जोरात बाळकृष्णाला घासत होती. एकीकडे तोंडानं बडबड चालूच होती. 'दातु..बाप्पा..दातु'. मला कळेना की आता देवांचे ते हाल पाहून ओरडावं की खाऊ खायच्या आधी त्यांनी दात घासावेत हा आग्रह धरला म्हणून कौतुक करावं !
मी विचार केला ... असूंदे, देवांचे दात तरी कोण घासणार?

-------------------------------

मी आणि कृष्णा संध्याकाळ्च्या भाजी आणायला जवळच्याच मार्केटमध्ये गेलो होतो. खाली सोडलं तर ही भाज्या उपसते म्हणून मी तिला कडेवर घेतलं होतं.
माझ्या एका बाजूला एक वयस्कर बाई तर दुसरया बाजूला एक छानशी जीन्स आणि रंगीत टॉप घातलेली कॉलेज गर्ल खरेदी करत होत्या.
त्या मुलीनं कृष्णाला 'hi' म्हणलं आणि ती भाजी घ्यायला खाली वाकली. तिच्या modern वेषभूषेमुळे वाकल्यावर तिची पाठ दिसू लागली. झालं. कृष्णाचं लक्ष तिकडे गेलं आणि ती टाळ्या पिटत म्हणायला लागली, 'ढेरी पम पम...ढेरी पम पम'. काय झालयं ते पटकन माझ्या लक्षात आलं. मला वाटलं की आता मी इथून गायबच होईन तर बरं.
माझ्या शेजारच्या आजी गालातल्या गालात हसू लागल्या. भाजीवाली हसत-हसत मला म्हणाली ... लेकरूच हाये.आसूंदेत.
मी अत्यंत दिलगिरीनं त्या मुलीकडं पाहिलं तर ती चक्क हसत होती. टाळ्या वाजवणारया कृष्णाला पाहून ती म्हणाली ... she is so sweet.

तिला मराठीच कळत नव्हतं !


- सोनाली सुहास बेंद्रे