Monday, April 02, 2018

गच्चीवरच्या बागेच्या गोष्टी - २


आमच्या गच्चीवरच्या बागेत कंपोस्टच्या 3- 4 मोठ्या कुंड्या आहेत. रोज त्यामध्ये ओला कचरा टाकणे, कोकोपीट आणि मग वाळलेल्या पानांचा थर पसरणे हा एक नित्यनेम आहे.

हे करत असताना अनेक पक्षी, खासकरून राखाडी मानेचे ४-५ कावळे आजूबाजूला जमलेले असतात. जिन्याचे लोखंडी कठडे, केबल आणि अजून कसल्या जाड वायर्स यांवर बसून त्यांचे या सगळ्याचे बारीक निरीक्षण चालू असते. थोडे पलीकडे, गच्चीच्या एका बाजूला पक्षांसाठी खाऊ ठेवलेला असतो. पण तिथे जमलेल्या इतर पक्षांना दमात घेऊन हुसकून लावणे आणि आजचा मेनू काय आहे ते पाहून उष्टावणे एवढे झाले की ते परत माझ्यावर नजर ठेवायला येऊन बसतात. माझी पाठ वळली की एक एक करून हे कावळे खाली उतरतात. कुठे चुकून ओल्या कचऱ्यात राहिलेला खाऊ, किडे टिपून घेतात. त्यांच्यापैकी कोणी जर हजर नसेल तर हाका मारून त्याला बोलवून घेतात.

यादरम्यान एखाद दुसरे कबुतर, साळुंक्या कधीतरी बुलबुल यांची दुसऱ्या बाजूला खाऊवर यथेच्छ मेजवानी चालू असते. आवडीचा खाऊ नसेल तर जशी विरक्ती आल्यासारखे हे कावळे या सर्वांकडे बघत बसतात. आणि खरं तर कबुतरांच्या दादागिरीला थोडे वचकूनही असतात.

आता तर आम्ही एकमेकांना थोडेफार सरावलो आहोत. कधी मला गच्चीवर जायला उशीर झाला तर आमच्या खालच्या मजल्याच्या खिडकीशी उतरलेल्या गुलमोहोराच्या फांदीवर पक्षांची वर्दळ वाढते. "आले, आज जरा उशीर झाला"  असे ओरडून सांगावे तर त्यांना ते कळले असे काहीसे वाटते. कारण गच्चीवर जाईपर्यंत आपापली जागा घेऊन ही मंडळी वाटच बघत असतात. आधी तर डोक्यावरून भुर्र्कन उडून जाणाऱ्या कावळ्यांची मला भीतीच वाटायची. पण आता थोडे अंतर राखून, त्यांचा एकमेव डोळा माझ्यावर ठेवून ते बसून राहतात आणि मीही निवांतपणे माझी कामे चालू ठेवते.

झाडांना पाणी घालताना, छोटेसे टोमॅटो, काकडीची पिवळीधम्मक फुले, मी-तू करत वाढणारे लाल माठाचे तुरे यांच्याशी गाणी- गोष्टी करताना कावळे हे माझे श्रोते आणि दर्शक असतात. मान तिरकी आणि एकूणच सर्व काही समजत असल्याचा अविर्भाव, मध्येच एखादी काव-काव अशी बसल्या जागेवरूनच साथ देत असतात. सोयीने जागांची अदलाबदल, कुठे क्वचितच  मातीतल्या काढून टाकलेल्या हुमणी आळीचा फडशा पाडणे हे त्यांचे होईपर्यंत माझे काम आटोपते आणि ही 15-20 मिनीटाचीच मैफल संपवून कावळे उडुनही जातात.

कधी काही कारणाने हा नेम मोडला की चुकल्यासारखे वाटते. घरचे सांगतात की आज तुझे पक्षीमंडळ वाट बघून खाली येऊन गेले. आमच्या कामवाल्या मावशी तर म्हणतात - अहो पूर्वज आहेत ते, म्हणून तर रोज बसतात वाट बघत.  रोजच्याला घास देताय, पुण्यच लागेल.

पापपुण्याचे माहीत नाही, पण रोजची झाडांच्या आणि पक्षीमित्रांच्या सहवासातील ती 15 मिनिटे दिवसभराची ऊर्जा देतात हे मात्र खरे!

© सोनाली सुहास बेंद्रे

Sunday, March 25, 2018

गच्चीवरच्या बागेच्या गोष्टी - १




यंदा फेब्रुवारीचे शेवटचे दिवस जरा तापूनच आले. मला आमच्या गच्चीवरच्या बागेची काळजी वाटू लागली. रोज पाणी घालताना माती फार कोरडी पडत नाही ना, कुंड्यांमधले पाणी टिकावे म्हणून पसरलेली वाळलेली पाने वाऱ्यावर उडून तर जात नाहीत ना किंवा कुठल्या हिरव्यागार पानाला उन्हाने नख तर नाही ना लावले याकडे बारकाईने लक्ष जाऊ लागले.
तशातच एका मोठ्या कुंडीत मजेत वाढलेल्या मदनबाणाच्या झाडाची पाने झडायला सुरुवात झाली. छान हिरवी असलेली पाने कुठे थोडीशीच सुकल्यागत होऊन जीव टाकू लागली. 2-3 दिवसातच सगळी पाने गळून झाड अगदी केविलवाणे दिसू लागले. उरल्या त्या वाळक्या उदास काड्या. त्याला तसं बघून जीव अगदी छोटासा होऊन गेला.  2 दिवस असेच गेले. खाली पडलेली मदनबाणाची ती ओळखीची पाने उचलून टाकताना भारी वाईट वाटू लागले. गच्चीवरील एवढी बाकी हिरवाई पण त्यात जीव रमेना.

एखादा दिवस गेला असेल आणि मदनबाणाच्या वाळक्या काड्यांवर छोटीशी हिरवी पाने फुटायला लागली. पुढच्या 2-3 दिवसातच त्याच्या हिरव्यागार पानांच्या गर्दीतून असंख्य पांढऱ्याशुभ्र कळ्या डोकावू लागल्या. चार पाच दिवसातल्या या सगळ्या कौतुकाचे नवल करेपर्यंत मदनबाणाच्या फुलांनी जसा उत्सवच मांडला. झाडावर उमललेल्या फुलांच्या त्या चांदण्या इतक्या सुरेख दिसत होत्या की 4 दिवसापूर्वीचे मरगळलेले झाड ते हेच का असे वाटू लागले.

पुढचे काही दिवस त्या मदनबाणाच्या चांदण्या निरखण्यात आणि त्याच्या वेड्या सुवासात मनसोक्त डुंबण्यात गेले. काही फुले देवाने ल्यायली, काही घरामध्ये जागोजागी सजून सुगंध देत राहिली, काहींचे गजरे झाले आणि अगदी आमच्या फळवाल्या आजीबाईंनीही माळून लाजून साजरे केले.

थोडीशी काय ती मदनबाणाची शुभ्र फुले पण केवढी त्याची ती मोहक किमया, नाही का?


© सोनाली सुहास बेंद्रे