Sunday, March 25, 2018

गच्चीवरच्या बागेच्या गोष्टी - १




यंदा फेब्रुवारीचे शेवटचे दिवस जरा तापूनच आले. मला आमच्या गच्चीवरच्या बागेची काळजी वाटू लागली. रोज पाणी घालताना माती फार कोरडी पडत नाही ना, कुंड्यांमधले पाणी टिकावे म्हणून पसरलेली वाळलेली पाने वाऱ्यावर उडून तर जात नाहीत ना किंवा कुठल्या हिरव्यागार पानाला उन्हाने नख तर नाही ना लावले याकडे बारकाईने लक्ष जाऊ लागले.
तशातच एका मोठ्या कुंडीत मजेत वाढलेल्या मदनबाणाच्या झाडाची पाने झडायला सुरुवात झाली. छान हिरवी असलेली पाने कुठे थोडीशीच सुकल्यागत होऊन जीव टाकू लागली. 2-3 दिवसातच सगळी पाने गळून झाड अगदी केविलवाणे दिसू लागले. उरल्या त्या वाळक्या उदास काड्या. त्याला तसं बघून जीव अगदी छोटासा होऊन गेला.  2 दिवस असेच गेले. खाली पडलेली मदनबाणाची ती ओळखीची पाने उचलून टाकताना भारी वाईट वाटू लागले. गच्चीवरील एवढी बाकी हिरवाई पण त्यात जीव रमेना.

एखादा दिवस गेला असेल आणि मदनबाणाच्या वाळक्या काड्यांवर छोटीशी हिरवी पाने फुटायला लागली. पुढच्या 2-3 दिवसातच त्याच्या हिरव्यागार पानांच्या गर्दीतून असंख्य पांढऱ्याशुभ्र कळ्या डोकावू लागल्या. चार पाच दिवसातल्या या सगळ्या कौतुकाचे नवल करेपर्यंत मदनबाणाच्या फुलांनी जसा उत्सवच मांडला. झाडावर उमललेल्या फुलांच्या त्या चांदण्या इतक्या सुरेख दिसत होत्या की 4 दिवसापूर्वीचे मरगळलेले झाड ते हेच का असे वाटू लागले.

पुढचे काही दिवस त्या मदनबाणाच्या चांदण्या निरखण्यात आणि त्याच्या वेड्या सुवासात मनसोक्त डुंबण्यात गेले. काही फुले देवाने ल्यायली, काही घरामध्ये जागोजागी सजून सुगंध देत राहिली, काहींचे गजरे झाले आणि अगदी आमच्या फळवाल्या आजीबाईंनीही माळून लाजून साजरे केले.

थोडीशी काय ती मदनबाणाची शुभ्र फुले पण केवढी त्याची ती मोहक किमया, नाही का?


© सोनाली सुहास बेंद्रे

No comments: