Tuesday, March 17, 2009

बालप्रश्न

रात्री झोपायच्या आधीचा गोष्टींचा कार्यक्रम रंगात आला होता. एका छानशा पुस्तकातल्या गोष्टी वाचून त्याला कळेलसं रूप देउन मी कृष्णाला सांगत होते. म्हणजे माझ्या साडेचार वर्षांच्या मुलीला. दिवसभर बाहेर असणारया आम्ही तिच्यासाठी रोज करण्याच्या गोष्टींतली ही एक.
तर त्यातल्या आपल्या सहा मुलांना एकटीने वाढवणारया आईची गोष्ट ऐकून अचानकच कृष्णा मला म्हणाली, "आई तू आणि बाबा पण एकदा म्हातारे होणार ना?"
"हो, का गं?"
"आणि मग तुम्ही star पण होणार?"
"अगं किती विचार करतेस राणी. चल मी तुला एक जोक सांगते."
"पण सांग ना आई? असंच असतं ना?"
आणि मग मी काही बोलायच्या आतच माझ्याकडे एकटक बघत ती मला म्हणाली,
"आई मग मी एकटीच राहणार का ग?"
मला पोटात मोठा खड्डा जाणवला. माझ्या मनात अधूनमधून उठणारा विचार शब्दात माझ्यासमोर आला होता. आमच्या तिघांच्याच घरात, रात्रीच्या शांत वेळेत, आम्हा मायलेकीतला संवाद खूप अस्वस्थ करणारा होता. तिच्या वयापेक्षा खूप जास्त एकचित्ततेनं ती माझ्याकडे पाहात होती. तिच्याकडे पाहताना मला जाणवलं की ही वेळ काही खोटं सांगून मारून नेण्याची नव्हती. मला याआधी इतकं शब्दरहित कधीचं वाटलं नव्हतं. पण उत्तर देण्यात उशीर करून चालणार नव्हता. नाहीतर मी तिचा विश्वास गमावला असता.
मी मनातले सगळे विचार बाजूला केले. चित्त पूर्ण एकाग्र केलं, माझ्या मनाचा सगळा सच्चेपणा आणि आत्मविश्वास एकवटला आणि तिला म्हणलं, "नाही गं बाळा, तू कध्धीच एकटी नसणार. तू मोठ्ठी होशील, खूप शिकून माझ्यासारखी office ला जाशील. आणि तुझ्याबरोबर तुझा नवरा असेल, तुला छोटी-छोटी बाळं होतील."
माझा सच्चेपणा माझ्या डोळ्यातून तिच्यापर्यंत पोहोचला. तिच्या डोळ्यातली एकटेपणाची भिती कमी झाली. आता तिथे उत्सुकता होती.
ती मला म्हणाली, "२-३ बाळं?"
मला थोडं हसू आलं. "हो."
"कुणाच्या पोटातून बाहेर येणार? माझ्या नवरयाच्या?"
"नाही गं बाळा. बाळं ना फ़क्त girls च्याच पोटातून बाहेर येउ शकतात. आणि मग ते दोघं आई बाबा आपल्या बाळावर खूप प्रेम करतात."
"आई, मग मी तेव्हा एक puppy पण आणणार."
मला हसू आलं, आत्ता जे नाही ते सगळं तिला तिच्या राज्यात करायचं होतं.
"आणि अगं आपला दादू, मुक्ताताई, ओमभय्या सगळे असतीलच की तुझ्याबरोबर."
परिचयातली आत्ये-मामे भावंडांची नावं ऐकून तिचा चेहरा काय फ़ुलून आला. खोडकर होऊन डोळे अगदी बोलू लागले.
"आणि आई शुभंकर दादा पण, मला तो खूप आवडतो."
"हो, खरंच की!" आता सगळ्या शंकांचं समाधान होऊन, आश्वस्त होऊन ती माझ्या कुशीत शिरली. तिच्या केसांचा वास घेत मी थोड्या वेळ शांत पडून राहिले.
"अगं आणि आपल्या सर्वांवर लक्ष ठेवणारा बाप्पा असतोच की. तो तुला कधीच एकटं पडून देणार नाही. हो की नाही?"
मी बहुतेक मलाच समजवत होते. कारण माझी चिमणी तर निवांत होऊन केव्हाच झोपून गेली होती.

Thursday, March 15, 2007

MRI - एक अनुभव

अतिचुंबकीय क्षेत्र ...
Consulting मधल्या त्या वाईट शक्यतांचं ओझं ... उलट-सुलट विचार...
सूचना ...
हलू नका, शांत पडून राहा,
थुंकी गिळण्याचीही हालचाल नको.
Angio आहे ... चक्कर येईल असं वाटेल.
मशीनचा आवाज येइल तर घाबरू नका.
काही वाटलं तर हातात हा सिग्नल आहे ... तो दाबा.
आणि ४५ मिनिटं लागतील. हललात तर अधिक.

हूं...
मी अजूनही विचारात... काय निघेल... काय झालं असेल...?

बापरे! काय हा आवाज!
कानात घुमतोय अगदी... डोक्यात जातोय.
घूं............घूं............

आवाज वाढतोय, लय बदलतीये...
असं वाटतंय की मी एका मोठ्या चक्रात बसलीये.
मला नाही आवडत चक्रात बसायला...
परवा त्या Funland मध्ये पण काय भिती वाटली. हसले मला सगळॆ.

उंच ... आणि उंचावरून अचानक खाली सोडून देतंय कोणीतरी.
असह्य आहे हे... गरगर... गरगर...
दाबू का हा सिग्नल?

किती वेळ झाला असेल?
१५ मिनिटं ... १० मिनिटं ... का ५ च?
अरे देवा! काही कळत नाहीये... हा वेळ का संपत नाहीये...

आवाज बदलला का?
वेगळं Cycle ...वेगळा आवाज...वेगळी लय.

माझा श्वास आत .. बाहेर.
आमचे योगाचे मास्तर म्हणतात तसं...
सावकाश श्वास घ्या...पूर्ण घ्या ... सावकाश, पूर्ण सोडा.
Inhalation ... complete exhalation

हे मशिन, ही थंडगार खोली, हे जग ... सगळं माझ्याभोवती फ़िरतंय. एका लयीत..
पण मी ठरवते ... मला चक्कर येणार नाही, मी ताठ उभी राहणार आहे.
फ़िरेना का हे चक्र...मी मात्र शांत, निश्चल.
...श्वासावर लक्ष केंद्रित करा, बाकी विचार आपोआप जातील.
हे आमचे योगाचे मास्तर सारखे कुठुन येतायत?

श्वास आत...बाहेर...
कायकाय आठ्वतंय...दिसतंय... चलतचित्रांसारखं.
माझं घर, झाडं, सुहास, कृष्णा, तिचे हात, आई...
थोडं अजून मागे...
मी..स्केचेस...कट्टा...Poster colors...
हात लावून बघू? पण हलायचं नाही! कोणीतरी म्हणतं.

मी या सगळ्यापासून लांब, एकटी.
शांत, संथ श्वास...मशिनच्या आवाजाच्या लयीत.

किती वेळ झालाय कोणास ठाऊक?
वेळेचं भानच नाही!
१..२..३....६०.. एक मिनिट. किती मोठा आहे हा एक मिनिट?
२,३,४,...किती मोजू?
मी घड्याळ आहे का?
हसूच येतं ... पण हसायचं तेही मनात!
टिक ... टिक ... टिक ... टिक ...

ही एक कसलीशी भिती सारखी सतावतीये.
काय असेल? काय होईल?
डॉक्टर म्हणाले, MRI करून बघू, काही असेल तर लगेच कळेल.

परत चित्रं हलतायत. काळी .. पांढरी, मध्येच रंगीत.
अनेक आकार, वेडे-वाकडे, सुंदर-कुरूप.
आकारातून तयार होणारी माणसं. काही माझी ... काही गर्दीतली.
परत तेच चक्र, तेच विचार... तोच आवाज.

किती वेळ झाला?
आई म्हणते, अशावेळी जप करावा. मन शांत होतं.
जय स्वामी समर्थ जय जय ...

कुठल्याशा न संपणारया प्रवासात असल्यासारखं वाटतंय.
जगाचं भान आहेही ... नाहीही.
डोळे उघडावे वाटतायत, पण उघडत नाहीत.
हात हलवावेसे वाटतायत, पण हलत नाहीत.
सुरुवातीच्या सूचना मेंदू तंतोतंत पाळतोय.
मन मात्र अगदी टक्क जागं आहे.
पाहतंय, ऐकतंय, माझ्याकडे बघतंय.

वेळ कसा त्याच्या गतीने चाललाय.
काय बरं गती असेल त्याची? या मशीनच्या आवाजाची?
Inhalation ... exhalation ...

आणि आवाज थांबतात. कोणीतरी काही बटणं दाबतं.
त्या चिंचोळ्या जागेतून बाहेर आल्याचं जाणवतं.
'उघडा डोळे'...'सावकाश'. समोर डॉक्टरांचा चेहरा.
माझा एकटेपणाचा ४५ मिनिटांचा प्रवास संपलेला अस्तो.
मला खूप छान हसू येतं. डॉक्टरही हसून जातात.
त्यांना समजतं सगळं... तसं नेहमीचंच असतं त्यांना ते!

Wednesday, November 08, 2006

मोठ्ठं होताना

खरंतर हे लिखाण आहे काही वर्षांपूर्वीचं. जेव्हा मोठं होण्यासाठी अगदी प्रथम घर सोडलं तेव्हाचं!
पण अलीकडे वाचताना लक्षात आलं की मोठ्ठं होण्याच्या या न संपणारया वाटेवर अजूनही असंच वाटतं की...
---------------------------------
असं वाटतं या कोषातून बाहेर पडूच नये कधी
लहान आहे ते लहानच राहावं
आईच्या पदराचा धुवट वास अनुभवत निवांत पडून राहावं...
पोटाशी पाय घेउन,गुरफतून तिच्या मायेत.
पण का बरं मोठं हे प्रत्येकाला व्हावंच लागतं?
आणि मग पंख पसरून घरट्याबाहेर उडायला लागतं?

घरटं सोडावं वाटत तर नाही
आणि नव्या क्षितीजांचे नवे विस्तार त्यांच्याकडेही पाठ करवत नाही.
दूरदेशी उडताना नवे प्रांत माणसे नवी
नवनव्या प्रवाहातून नकळत मिळणारी दिशा नवी.
नव्या दिशेने वाटचाल थोडी अडखळत, धडपडत...
एकदा ठेच लागल्यावर आपलं आपणच सांभाळत

जिथे बोट धरून चालवायला शेजारी कोणीच नसतं...
उचललेलं पाऊल बरोबर आहे?
आपलं आपल्यालाच माहीत नसतं
नेहमी सावलीतूनच चालायची सवय असणारी पाऊलं,
उन्हं लागली तरी माहीत असायचे त्यांना सावल्यांचे पत्ते.
नव्या जागच्या सावल्याही अनोळखी ... परक्या...
मुकाटपणे त्यांना मग सोसावे लागतात चटके.
चटकेच मग अचानक मोठं करून जातात
चारचौघात 'मोठेपणा' बाळगायला शिकवतात.

मोठेपणाचं कवच बाहेर मिरवता येतं
एकटं असताना मात्र आतून वाटत राहातं...
नकोच हे मोठेपण...या जबाबदारया...
हे मोठ्या जगाकडे डोळे उघडून बघणं
आणि दिपलेल्या डोळ्यांनी मोठ्या वर्तूळात फिरणं
नको घ्यायला ऐकून व्यवहाराचं बोलणं
पावलोपावली 'आपल्या' विश्वातलं अंतर वाढत जाणं
कारण परत हे अंतर पार नाही होणार
छोटंसं जग आधीचं आता पलीकडेच राहणार
पण मग परत जावं वाटलं तर काय बरं करायचं
परतीच्या वाटेवर परत मागे फिरायचं?
पण आम्ही धीराचे शिलेदार मागे कसे जाणार...
आम्ही असेच शब्दातनं जूनं विश्व अनुभवणार...
आता आम्ही मोठे झालो म्हणून बालपण संपलं म्हणणार

पाहा आम्ही सहजी एकटे चालू शकतो
एवढं सगळं धीरानं समजून सांगून शकतो-
- स्व:तला आणि दुसरयालाही...
पण या मोठ्या गप्पा मारल्या तरी-

बालपणीच्या गोष्टीतला
शेणामेणाच्या घरट्यातला
चिमणा पक्षी गुणगुणतोच...
का बरं मोठं हे प्रत्येकाला व्हावं लागतं..
आणि मग पंख पसरून घरट्याबाहेर उडायला लागतं...

Thursday, October 19, 2006

cookies आणि भिकारी

काल आम्ही चौघी ऑफिसनंतर दिवाळी शॉपिंगला गेलो होतो.
काहीच नाही आवडलं तसं मी आणि राधिका बाहेर येऊन थांबलो.
तर समोर प्रसिध्द 'cookie man' चा स्टॉल. खाल्ल्या मग. एक cookie रु.२५ फक्त. एकूण १०० रुपयाच्या खाल्ल्या.
मी राधिकाला म्हणलं पण. आईला कळलं तर म्हणेल, १०० रुपयाची बिस्कीटं गं कसली खाता? आहे म्हणून हे असे उधळायचे का? पेक्षा सत्कारणी लावा.

घरी परत येताना गाडी सिग्नलला थांबली. नेहमीसारखी १-२ छोटी पोरं खिडकीच्या काचेवर टकटक करू लागली.
ताई भूक! मीदेखील नेहमीसारखंच दुर्लक्ष केलं. पुढे जा...

रात्री दिवसाचा पाढा वाचताना सुहासला म्हणलं, अरे ते 'cookie man' पुण्यात आलंय, अमूक mall मधे. काय सही cookies आहेत. १०० रुपयाच्या खाल्ल्या.

आणि आजकाल भिकारी पण किती झालेत ना सिग्नलला !

Thursday, October 05, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

आदित्यने मला ह्या खेळात सामील करुन घेतले. खेळाविषयी अधिक माहितीकरिता
http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html

१.सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक
~ ‘गोंदवलेकर महाराजांची प्रवचने’ – गोंदवलेकर महाराज

२. वाचले असल्यास त्याबद्द्ल थोडी माहिती.

~ प्रवचनं म्हणलं तर कदाचित तुम्हाला ‘कंटाळवाणं’ काहीतरी असं वाटू शकेल. पण हे पुस्तक प्रवचनापेक्षा खूप अधिक काहीतरी देते जे समजायला, पचायला खूप सोपं असतं. हे पुस्तक रोज एक पान याप्रमाणे वर्षभर वाचून आचरणात आणण्यासाठी आहे. अप्रतिम लेखनशैली, अतिशय सोपी भाषा आणि नित्य व्यवहारातली साधी उदाहरणे यामुळे नामस्मरणासारखा विषयही सहजसुंदर आणि कृतीस उद्युक्त करणारा झाला आहे.

३. अतिशय आवडणारी /प्रभाव पाडणारी ५ पुस्तके.

~ ‘जावे त्यांच्या देशा’ – पु.ल. देशपांडे
~ ‘आहे मनोहर तरी’-सुनिताबाई देशपांडे
~ ‘नॉट विदाउट माय डॉटर’ –
~ ‘विदेश’

४. अद्याप वाचायची आहेत अशी ५ मराठी पुस्तके
~ सगळीच …

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे
~ मला ‘जावे त्यांच्या देशा’ हे पु.लं. चं पुस्तक अतिशय आवडतं. सर्वाधिकवेळा वाचण्याबरोबरच मी हे पुस्तक अनेकदा भेटीदाखलही दिलेलं आहे. हे पुस्तक वाचताना आपण ते प्रत्यक्ष जगतोय असं वाटतं. त्यातली पात्रं आपण जगतो किंवा ती आपल्या सर्वसाधारण माणसाच्या कल्पनेत इतकी फिट्ट बसतात की दोन देशांमधलं अंतर … राजकीय सीमा हे काहीच मध्ये येत नाही. मला वाटतं ... याच गोष्टी या पुस्तकाशी कायमचं बांधून ठेवतात.

ह्या खेळात सहभागी व्हायला मी ह्यांना निमंत्रित करते
अभिजीत बाठे
नंदन

Sunday, September 17, 2006

आक्कात्ती

आज तू नसलेलं तुझंच घर मी आतबाहेर पाहिलं,
आणि परत एकदा जाणवलं...की आता तू नाहीस, परतून येणारही नाहीस.
काही व्यक्ती, काही जागा, त्यांचं आपल्यात असणं,
का आपण त्यांच्यात जगणं, हे इतकं सवयीचं असतं,
की रिकाम्या जागा मनास पटतंच नाहीत
आणि त्या कोणी भराव्यात असं वाटतही नाही.

खरंतर आता आम्ही लहान नाही...
आमच्या मुलांची पणजी होऊन तृप्त झालेल्या तुझ्या आठवणी मात्र खूप जुन्या...
सोमवारातल्या घरात, मधल्या खोलीतल्या, पाटीवरच्या गणितांच्या आणि तुझ्या हातातल्या पट्टीच्या!
मग भाईची आणि माझी धडपड...गणितं सुटायला हवीत. कारण समोर हातात पट्टी धरलेली तू ... आमची आजी!
मग एक दोन पट्ट्या आणि पाटी भरून गणितं झाली की कळवळलेली तू हातावर ५० पैसे दयायचीस आणि मी आणि भाई पार अपोलो टॉकीजच्या कुल्फ़ीवाल्याकडं धूम ठोकायचो.
गणपतीत तर तुला कोण हौस. ढीगभर नातवंडं गोळा करायची, गणपती दाखवण्याची आणि खाऊ-पिऊ घालण्याची.
खरंतर तुला सगळंच फिरून पाहण्याची, उपभोगण्याची फार आवड. आम्हा कॉलेजात जाणारया नातींना तू नेहमी
म्हणायचीस...जरा मलापण न्या गं तुळशीबागेत. नवीन पध्द्त्तीच्या टिकल्या, माळा, पाहायला, फिरायला.
पण आम्ही आमच्याच तालात...धुंदीत!
कधी म्हणायचीस, अगं आवरा जरा...पावडर कुंकू करावं...मुलीच्या जातीनं कसं नीट-नेटकं राहावं.
हे काय राहाणं? केसांना तेलाचा हात नाही...फ़िरतात गावभर तशाच. जरा ये एक दिवस,खसखसून न्हायला घालते.

दिवाळी आली की तुझी कोण गडबड. माझ्या दारात रांगोळी काढा गं...रंग भरा गं...
दारात खुर्ची टाकून पाहात बसायचीस. पण आम्ही हळूच सटकायचो...काहीतरी थातूर-मातूर कारणं काढून.
मग बोलणी...काय पोरी आहेत...आगाऊ नुस्त्या...जरा चार बोटं काढतील तर ... पण नाही!
हे ऐकायला आम्ही जागेवर तर हवं!
पण हेच नमस्काराला मात्र पुढे...हात पसरून! तेव्हा मात्र हातावर पैसे ठेवणारी, कानशिलावर मायेची बोटं मोडणारी, आणि आवर्जून सगळ्यांची, अगदी घरादारासकट द्र्ष्ट काढणारी....ती तूच...आमची आजी.

... पण आताशा फार थकली होतीस गं.
आम्हा सर्वांची लग्नं, संसार, मुलंबाळं, आमच्या तारुण्याच्या जोमात तुमची झपाट्यानं सुरकुतणारी पिढी आम्हाला 'दिसायची' तर खरं...पण 'लक्ष' दयायला वेळ नाही व्हायचा.
आम्ही आमच्यातच मग्न. आमचा जॉब, आमची कामं, आमची घरं ... परदेश वारया...
तुला मात्र कोण अभिमान...नातवंडांचा, सुना-जावयांचा. येणारया-जाणारयाला कौतुकानं सांगायचीस...फारिनला जाऊन आलीये. आणि मग कोपरयात घेऊन मला हळूच विचारायचीस ... कागं, पगार तर बरा मिळतो ना...?

संध्याकाळ झाली की तू थांबत-थांबत का होईना २ जिने चढणार, आणि पणतवंडांच्यात येऊन बसणार. भेटलं की ओरडणार, भेटायला येऊ नका...आम्ही वर गेलो की मग या!!
पण आमच्या व्यापात आम्ही गर्क. तू मात्र परत परत म्हणायचीस ... अगं भेटा गं. जरा आलं की ५ मिनिटं तरी.
मग आम्ही कधीतरी ५ मिनिटं तोंड दाखवायला यायचो. म्हणायचीस, बास आता... जागा रिकामी करायला हवी ... तर आम्ही हसण्यावारी न्यायचो.

पण दवाखान्यात तुला पाहिलं आणि मनचं हललं गं! कमालीचं थकलेलं शरीर आणि जाणिवेच्या अलीकडं-पलीकडं घोटाळणारं तुझं मन!
चिऊ-काऊच्या घासासारखं बोलण्यात गुंगवून तुला बळेच भरवताना जाणवली ती तुझी अनिच्छा, तुझ्या वेदना, आणि एक अलिप्तता...?

... आणि मग २-३ दिवसात समजलं की तू नाहीस.

दु:खाच्यावर पश्चात्तापाची भावना मन व्यापून गेली.

आज तू नसलेल्या तुझ्या घरात प्रत्येक गोष्ट पोरकी वाटली.
तुझी पुस्तकं ... तुझे देव... रांगेत मांडलेले तुझे जिवा-भावाचे पितळी डबे आणि तुला मीच रंगवून दिलेला मोठा श्रीकृष्णही!

तुझ्या नावाच्या दिव्याजवळ तास-दोन तास बसताना वाटलं ... हा वेळ तेव्हा झाला असता तर ...? कारण तुला आमचा फक्त वेळच तर हवा होता!!

Friday, May 05, 2006

आंबा

आंबा म्हणलं की आठवतो तो त्याचा मऊसूद केशरी रंग ... स्वत:तच मग्न असलेला त्याचा आकार ... आणि उन्हाळा संपला तरी वर्षभर मागे रेंगाळणारी ती सुगंधीत चव.

एप्रिल महिन्याच्या तोंडाशी बाजारात जावं. तो चिरपरिचीत गोड वास हळूहळू वातावरणात भरू पाहात असतो.
'कसा दिला...?'
'काय फळ आहे पाहा तर खरं...'
'अस्सल रत्नागिरी आहे ताई ... '
'खराब निघाला तर तस्सा परत आणीन ...'
असे नेहमीचेच ठेवणीतले संवाद कानावर पडायला लागतात. आणि जशी काही बाजारात द्वाही फ़िरते...'आंबा आला'.

उन्हाचा कडाका वाढतो. मुलांचे परीक्षांचे निकाल लागून कानात वारं घुसल्यासारखं त्यांचं हुंदडणं सुरू होतं. घराघरात कुठे कोठीच्या खोलीत, तर कुठे खाटेखाली पोतं पांघरून गुपचूप एका रांगेत मांडलेले आंबे बाळगोपाळांना खुणावू लागतात. मग कुठे आईचा डोळा चुकवून, दुपारी सगळे झोपल्यावर आंबा पळवून खाण्याचे उद्योग सुरू होतात.
खरंतर आंबा म्हणलं की त्याच्याशी जोडलेल्या बालपणीच्या अशा कितीतरी आठवणी ताज्या होतात.

मला आठवतं ... आमच्या प्राथमिक शाळकरी दिवसात आंबा म्हणलं तर आमची आई रायवळ, गोटीच आणायची. जास्तीत जास्त ऎश म्हणजे पायरी. हापूस हा क्वचितच मिळायचा ... आणि तोही पाहुण्यांच्या निमित्तानं.

उन्हाळ्याची सुट्टी पडली आणि आंब्यांचा मोसम सुरु झाला की मी आणि भाऊ आमची अगदी गडबड सुरू व्हायची.
'आई ... आंबे कधी आणायचे? गल्लीत अमक्याकडे आणलेपण...'
शेवटी आमच्या रोजच्या कटकटीला वैतागून आई एकदाची म्हणायची, 'चला आणूया.'

तर तो सोन्याचा ... नव्हे आंब्याचा दिवस एकदाचा उगवायचा. सकाळी १० ते १०-३० ला बागेकडे भरणारया बाजारात जायला मी आणि भाऊ तयार व्हायचो. अशावेळी गल्लीतले खेळ, बाकी कुठलीही आमिषं, आणि मुख्य म्हणजे आपापसातली भांडणं सारं विसरून एकजुटीनं आम्ही दोघं सर्वतोपरी आईला मदत करायचो. एकजण घरातली शक्य तेवढी मोठी पिशवी शोधून तर दुसरा आईला 'पुरेसे पैसे घेतलेत ना...' वगैरे खात्री करत, आईला पूर्ण भाव देत बाजारात जायचो. आईपण या दिवसात आमच्याकडून सुट्टीतला अभ्यास, आपापले कप्पे आवरणं, वगैरे कामं करून घ्यायची.

बाजारात पोहोचलं की खरी धमाल सुरू व्हायची. आई आधी भाजीपासून सुरुवात करायची. एरवी आम्ही कितीही कटकट केली असती तरी आत्ता आमचे हात दगडाखाली असतात...करणार काय? एक डोळा आंब्यांच्या गाड्यांकडे ठेवून आम्ही भाजीखरेदी करणारया आईच्या मागे-मागे फिरायचो. एरवी गर्दीत आम्ही हरवू याची काळजी घेणारया आईला आज आम्ही तिची पाठ सोडणार नाही याची अगदी खात्री असायची.
तोवर गल्लीतलं कोणी दोस्त मंडळ आपल्या आयांबरोबर जर भेटलं तर भाऊ त्यांना तत्परतेनं सांगायचा 'आम्ही आंबे घ्यायला आलोय.' तेवढ्यात मी पण २-३ गाड्यांवर आगाऊपणाने भाव विचारून यायची. म्हणजे काय...नंतर आईचा वेळ जायला नको.
शेवटी एकदाचं भाव करणं चालू व्हायचं. आईच्या द्रुष्टीनं सगळेच आंबेवाले भाव जास्त सांगत असायचे. तर आम्हाला वाटायचं - काय ही आई? एवढं स्वस्त कोणी देईल का?
'आई, अगं घे ना...किती कमी करतोय तो...' आम्ही
'तुम्ही गप्प बसा...पुढे बघू...मधे-मधे बोलू नका' - आई
आम्हाला कळायचं नाही की अजून हिला स्वस्त कोण देणार आहे? मनातून धाकधूक पण वाटायची की आईनं नाहीच आंबे घेतले तर...
शेवटी एकदाचे तिला हव्या त्या भावात ती आंबे मिळवायचीच. माझी आणि भावाची आता ती टोपली उचलण्याची धावपळ चालू व्हायची. आम्हा दोघांना बाजूला सारून शेवटी ते ओझं आईच उचलायची. आम्ही महाराजांच्या भालदार-चोपदारा सारखे पुढे-मागे.

तर असे एकदाचे आमच्या घरात आंबे यायचे. धाकटा भाऊ लगेच खायच्या तयारीत.
'दम धर ... देवाला ठेऊंदे आधी...' आई.
मग देवाला दिवा लावणं ... आंबा ठेवणं ... हात जोडणं ...
'जोडा हात ... लक्ष कुठयं?' आई.

आंब्याचा रस काढणं हादेखील एक मोठासा कार्यक्रमच असायचा.
मला आठवतं सुट्टीला गावी आजीकडे गेलं की मामा पोत्यातून शेकड्यावर आंबे आणायचा. आजी मोठ्ठ्सं पातेलं समोर घेऊन आंबे पिळायला बसायची. आम्ही मामे-मावस भावंडं तिच्याभोवती गोलाकार बसायचो. आंब्याचा रस काढला की त्याची कोय आजी एकेकाला चोखायला दयायची. आम्ही सगळीजणं अक्षरश: आशाळभूतासारखं आपल्याला कोय कधी मिळणार याची वाट बघत बसायचो.
दुपारी भरपूर रस ओरपून, परत संध्याकाळचं ओटीवर बसून गोटी आंबे चोखणं आणि साली पलीकडच्या वाड्यात फेकणं अशी सगळी रसाळ सुट्टी असायची. पण तरीही आजी रस काढताना त्या कोयींमध्ये मात्र जीव अडकायचाच.

आता बाजारात आंबा आला की लगेच घरात टेबलवर पण येतो. रायवळ, गोटी सोडा, पायरीपण आणला जात नाही. हापूस शिवाय आमचं जसं पानच हालत नाही.

तरीही दरवर्षी पहिला आंबा आणला की आठवणीतला हा आंबा नव्यानं मोहोरतो. आपल्या बाळांना आंबा चाखवताना बालपणीतला हा आंबा हळूच खुणावतो. भाऊ आठवणीनं फोनवर विचारतो 'ताई, किती भांडायचो गं आपण ... चोरून खायचो आंबा ... आठवतं का?'
बालपणातला तो रायवळ ... ते चोखताना कोपरयापर्यंत गेलेले ओघळ ... आम्हाला 'आंब्यावर बसलेत अगदी' म्हणून ओरडणारी आई ... आठवणीतला तो आंबा अधिक मधूर वाटतो. वर्षागणिक त्याची रसाळ गोडी जशी वाढतच जाते.