Tuesday, March 17, 2009

बालप्रश्न

रात्री झोपायच्या आधीचा गोष्टींचा कार्यक्रम रंगात आला होता. एका छानशा पुस्तकातल्या गोष्टी वाचून त्याला कळेलसं रूप देउन मी कृष्णाला सांगत होते. म्हणजे माझ्या साडेचार वर्षांच्या मुलीला. दिवसभर बाहेर असणारया आम्ही तिच्यासाठी रोज करण्याच्या गोष्टींतली ही एक.
तर त्यातल्या आपल्या सहा मुलांना एकटीने वाढवणारया आईची गोष्ट ऐकून अचानकच कृष्णा मला म्हणाली, "आई तू आणि बाबा पण एकदा म्हातारे होणार ना?"
"हो, का गं?"
"आणि मग तुम्ही star पण होणार?"
"अगं किती विचार करतेस बाळ ? चल मी तुला एक गंमत सांगते."
"पण सांग ना आई? असंच असतं ना?"
आणि मग मी काही बोलायच्या आतच माझ्याकडे एकटक बघत ती मला म्हणाली,
"आई मग मी एकटीच राहणार का ग?"
मला पोटात मोठा खड्डा जाणवला. माझ्या मनात अधूनमधून उठणारा विचार शब्दात माझ्यासमोर आला होता. आमच्या तिघांच्याच घरात, रात्रीच्या शांत वेळेत, आम्हा मायलेकीतला संवाद खूप अस्वस्थ करणारा होता. तिच्या वयापेक्षा खूप जास्त एकचित्ततेनं ती माझ्याकडे पाहात होती. तिच्याकडे पाहताना मला जाणवलं की ही वेळ काही खोटं सांगून मारून नेण्याची नव्हती. मला याआधी इतकं शब्दरहित कधीचं वाटलं नव्हतं. पण उत्तर देण्यात उशीर करून चालणार नव्हता. नाहीतर मी तिचा विश्वास गमावला असता.
मी मनातले सगळे विचार बाजूला केले. चित्त पूर्ण एकाग्र केलं, माझ्या मनाचा सगळा सच्चेपणा आणि आत्मविश्वास एकवटला आणि तिला म्हणलं, "नाही गं बाळा, तू कध्धीच एकटी नसणार. तू मोठ्ठी होशील, खूप शिकून माझ्यासारखी office ला जाशील. आणि तुझ्याबरोबर तुझा नवरा असेल, तुला छोटी-छोटी बाळं होतील."
माझा सच्चेपणा माझ्या डोळ्यातून तिच्यापर्यंत पोहोचला. तिच्या डोळ्यातली एकटेपणाची भिती कमी झाली. आता तिथे उत्सुकता होती.
ती मला म्हणाली, "२-३ बाळं?"
मला थोडं हसू आलं. "हो."
"कुणाच्या पोटातून बाहेर येणार? माझ्या नवरयाच्या?"
"नाही गं बाळा. बाळं ना फ़क्त girls च्याच पोटातून बाहेर येउ शकतात. आणि मग ते दोघं आई बाबा आपल्या बाळावर खूप प्रेम करतात."
"आई, मग मी तेव्हा एक puppy पण आणणार."
मला हसू आलं, आत्ता जे नाही ते सगळं तिला तिच्या राज्यात करायचं होतं.
"आणि अगं आपला दादू, मुक्ताताई, ओमभय्या सगळे असतीलच की तुझ्याबरोबर."
परिचयातली आत्ये-मामे भावंडांची नावं ऐकून तिचा चेहरा काय फ़ुलून आला. खोडकर होऊन डोळे अगदी बोलू लागले.
"आणि आई शुभंकर दादा पण, मला तो खूप आवडतो."
"हो, खरंच की!" आता सगळ्या शंकांचं समाधान होऊन, आश्वस्त होऊन ती माझ्या कुशीत शिरली. तिच्या केसांचा वास घेत मी थोड्या वेळ शांत पडून राहिले.
"अगं आणि आपल्या सर्वांवर लक्ष ठेवणारा बाप्पा असतोच की. तो तुला कधीच एकटं पडून देणार नाही. हो की नाही?"
मी बहुतेक मलाच समजवत होते. कारण माझी चिमणी तर निवांत होऊन केव्हाच झोपून गेली होती.


- सोनाली सुहास बेंद्रे