लहान असताना बाबांची उंची हा माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानाचा विषय होता. आठवणी शोधत लहान होताना समोर उभे असलेले उंच बाबा आणि मान मोडेतो वर पाहणारी छोटी मी हे चित्र स्पष्ट आठवतं. त्यांच्याबरोबर बाहेर जाताना आपले बाबा हे सगळ्या बाबांच्यात उंच आहेत याचा खूप आनंद व्हायचा आणि अतिशय सुरक्षित वाटायचं. माझी उंची वाढताना आदर्श नवर्याच्या अपेक्षायादीत बाबांसारखी उंची असलेला हे प्रथम क्रमांकावर असायचं. असो.
लहानपणी गुरुवार आणि चितळे बंधूंची बाकरवडी व जिलेबी हे आमच्यासाठी अतूट समीकरण होतं. तेव्हा चितळे बंधूंकडून या गोष्टी खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर मोठी रांग असायची. बाबा त्यांच्या गुरुवारच्या सुट्टी दिवशी कितीही उशीर झाला तरी बाकरवडी आणि जिलेबी आणायचेच. गुरुवार हा जणू मेजवानीचा दिवस असायचा :)
सगळ्या चुलत भावंडात एकत्रित राहताना, खेळताना जखम झाल्यावर, खास करून योगीला, दम देऊन घट्ट धरून औषध लावणारे बाबा, नंतर खाऊ समान वाटणारे, फळं कापून खायला घालणं याचा जणू एक कार्यक्रम करणारे, दिवाळीत सगळ्यांना गोल बसवून आहे त्या फटाक्यात रोजचं रेशन देणारे बाबा आम्ही ते वाजवतोय ना इकडे पण लक्ष द्यायचे. लहानपणी मी हातात उदबत्ती घेऊन लक्ष्मी बॉंम्ब कडे बराच वेळ बघत बसायचे, भीती वाटायची पण फटाके वाजवायचेच हे बाबांनी सांगितलेलं असायचं. बाबा हात धरून, समजून सांगत फटाके लावायला मदत करायचे. मग हळूहळू फटाक्यांच्या रोषणाईच्या गंमतीत भीती पळून जायची. थोडी भीती घालवली, धीर धरून गोष्टी केल्या की त्याचं मिळणारं फळ हे पण मोठं गोड असतं. बाबांकडून मिळालेला हा धडा २ वर्षांपूर्वी भूतानला टायगर नेस्ट हा एक मोठा ट्रेक करताना नकळत कृष्णाला दिला गेला.
बाबांनी मला आणि योगीला आमच्या आवडीप्रमाणे त्यांच्या परिघातल्या उत्तम गोष्टी उपलब्ध करून दिल्या. मग ते योगीसाठी क्रिकेट प्रशिक्षण आणि त्यातील गोष्टी असोत किंवा माझ्यासाठी चित्रकलेचं सामान असो. मी मोडक्या कविता लिहिती झाल्यावर मोठ्या कौतुकाने मुलांच्या मासिकांचा अभ्यास करणं, संपादकांशी पत्रव्यवहार करणं आणि चिकाटीने त्या कविता छापून आणणं, आकाशवाणीमध्ये प्रयत्नपूर्वक बालचित्रवाणीमध्ये सहभाग मिळवणं हे सगळं त्यांनी खूप उत्साहात केलं. वेगवेगळ्या गोष्टी हाताळणं आणि त्यातून आपल्याला काय आवडेल हा अंदाज घेणं हा आत्मविश्वास त्यातून आला.
मी जाहिरात क्षेत्रात पदवी घेणं ही तेव्हा वेगळी गोष्ट होती, सर्वमान्य नव्हती. पण शिक्षणाच्या त्या ५ वर्षात आई-बाबांनी दाखवलेला प्रचंड विश्वास, नंतर बंगलोर ला नोकरीसाठी जाण्याची माझी इच्छा असताना त्यांचं पाठीशी उभं राहणं या २५ वर्षांपूर्वी खूप मोठ्या गोष्टी होत्या, त्यांच्या त्या विश्वासाने माझा आत्मविश्वास दुणावला. तो सगळा काळ खूप खूप समृद्ध झाला. उत्तम गुरू लाभले, जीवाला जीव देणारं मित्रमंडळ मिळालं आणि त्या सगळ्यांना आई-बाबांनी घरचं मानलं.
आम्हा दोन्ही मुलांबाबतचे महत्वाचे निर्णय घेताना बाबांनी आम्हाला कमालीचं निर्णय स्वातंत्र्य दिलं. प्रत्येकवेळी त्यांच्या स्वभावानुसार संदर्भ तपासायला सांगितले, फायदे-तोटे समजून सांगितले. एकांगी निर्णय न घेता ते आमच्यावर सोडले. बाबांच्या या सवयीचा, ऍनालीटीकल स्किल्स चा मला खूप फायदा झाला. हे कौशल्य मला माझ्या नोकरीत आणि व्यवसायात खूप उपयोगी आलं , येतंय.
प्रत्येक प्रसंगात पाठीशी राहणारे आई आणि बाबा.
जगात मिसळण्यासाठी वेळेवर हात सोडून देणारे, पण आपली मुलं केव्हाही आधाराला परत येऊ शकतील या जाणिवेनं सतत न थकता उभे राहणारे, माझ्या लग्नाला केवळ ८ दिवस राहिलेले असताना तू ठीक आहेस ना, काही प्रश्न नाहीत नं असे विचारणारे बाबा, माझ्या अवघडशा बाळंतपणात सगळं ठीक होईल हा विश्वास देणारे आणि माझी काळजी डोक्यावर घेणारे, माझ्या लहानशा पिल्लाची सुरुवातीची २ वर्षे जसं काही पालकच झालेले, कृष्णाच्या मोठं होण्याच्या वयात आम्ही दोघे कामानिमित्त बाहेर असताना तिच्याशी फोन करून बोलत राहणारे, माझं मन मोकळं करण्याचे हक्काची जागा असलेले बाबा...
... आता माझा आणि कृष्णाचा आवाज ऐकायला म्हणून रोज आवर्जून फोन करतात. स्मार्ट फोन वापरताना कुठेतरी अडतात आणि मग २-२ दा विचारून खात्री करून घेतात. मोठ्या अभिमानाने इंजिनीअर होऊ घातलेल्या नातवाचं, त्याच्या गीता अभ्यासाचं न थकता माझ्यापाशी कौतुक करतात, गुगल पे वापरता का म्हणलं तर नको नको म्हणतात, सावकाश चालतात, कधी माझ्याकडे आलेच तर झोपताना लाईटची बटणं आणि गॅस २ दा तरी चेक करतात, काही दुखणं आलं तर काळजी करतात की इतरांना त्रास नको, कधी झालीच माझी चिडचिड तर शांत बसतात, आणि थोड्याच वेळात नवीन जगाबद्दलचे प्रश्न मला परत परत फोन करून विचारतात... तेव्हा मला वाटतं की आता आमचे रोल बदलले आहेत, आणि मी त्यांची हळूहळू पालकच होतीये .
- सोनाली सुहास बेंद्रे