Friday, January 27, 2006

रविवार ... मी .. आणि .. माझी लेक

रविवार. घरात आम्ही दोघीच .. मी आणि कृष्णा. कृष्णा म्हणजे माझी दीड वर्षांची लेक.
तर रविवारी पहटेच्या साखरझोपेत असताना मला जाणवतं की कोणीतरी गपकन माझ्या पोटावर बसलयं. अर्ध्या गुंगीत, घाबरून मी डोळे उघडते तर ही बया माझ्या पोटावर बसून घोडा-घोडा खेळत असते. घड्याळात पाहावं तर पहाटेचे ६-३० !
रविवारची सुरुवात ही अशी होते. आईला सुट्टी म्हणजे आपला पुरेपूर सहवास हा तिला लाभलाच पाहिजे असा जणू तिचा पणच असतो.

तिचा बाबा ऑफ़िसला गेल्यावर तर मला ही अगदीच एकाकी, विनारसद लढत वाटू लागते.
उजाडल्यापासून पायाला चक्रं बांधल्यासारखी तिची घरभर फिरती चालू असते. कांद्या-बटाट्याची टोपली उचकून घरभर कांदे पसरवणं, बाथरूममध्ये जाउन अंगावर पाणी ओतून घेणं, वर्तमानपत्रं, भिंती इ. वर स्केचपेन-पेन्सिल यांनी गहन गिरगोट्या ओढणं अशी तिची एक ना अनेक महत्त्वाची कामं चालू असतात.

आमच्या देवांना पूजेचा बहुमान हा फक्त शनिवार-रविवारीच मिळतो. आता पूजा करावी म्हणून मी देवघरापाशी जाते आणि बघते तर काय .. देव गायब! मला कळत नाही देव कुठे गेले? आणि मग अचानक लक्षात येतं की कृष्णाचा बराच वेळ झाला आवाज नाहीये. बाथरूममधून पाण्याचा आवाज येतो. जाउन बघते तर काय .. तांब्यानं देवांवर अभिषेक चालू असतो.
मला पाहून आधी ती जरा दचकते. आता ही आई आपल्यावर ओरडणार अशा खात्रीनं क्षणभर बघते आणि मग लगेच आपलं ते प्रोफेशनल गोड हसू चेहरयावर आणून मला म्हणते, 'बाप्पा .. मंबो'! म्हणजे बाप्पाची शंभो चालू आहे.
आता काय बोलणार? तो सर्व पसारा आवरून एकदाची बाप्पाची पूजा आटपते.

आता मोठ्ठा कार्यक्रम ... कृष्णाचं जेवण.
एका ताटात वरण-भात, दोन रिकाम्या वाट्या, २-३ चमचे, ३-४ चित्रांची पुस्तकं घेऊन कार्यक्रम सुरू होतो. त्याच्याबरोबरीनं खाल्लं नाहीतर भिती दाखावायला बुवा, गुरखा, डॉक्टर, टुचू वगैरे मदतीला असतातच.
५-६ घास खाऊन झाले की हातात भात घेउन तो जमिनीवर सारवणं, केस उपटून टकल्या केलेल्या आणि लोळवून मळलेल्या बाहुलीला जबरदस्ती भरवणं, आदी चालू होतं. एका बाजूनं माझी लेकी बोले, सूने लागे बडबड चालूच असते.
"वेडी बाहूली .. खात नाही .. वेडी आहे ना?"
"हूं ..." कृष्णा.
"थांब तिला बुवाकडेच देते. देउ का?"
"हूं ..." कृष्णा.
"टुचू देउ का तिला? बोलवू डॉक्टर काकांना?"
"हूं ..." कृष्णा.
सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. पुढचा अर्धा तास कृष्णा, बाहुली आणि फरशी यांच्या सफाईत जातो.
तोवर ही इकडे बाहुलीला ओरडत असते.
"वेई ..हां ..!"
"टुचू .. हां ..!"
जे काही थोडंफार बोलता येतं तेच ती माझी नक्कल करत बाहुलीला सुनावत राहते.
बाहुलीनं आता ऐकलं अशी खात्री पटल्यावर मग पुढच्या उद्योगाचा शोध सुरू होतो.

एवढ्यात आमच्या शेजारची कृष्णाची मैत्रीण 'अस्मी' खेळायला येते. कृष्णा आपली मळकी, टकली बाहुली सोडून बाकी पुस्तकं, दोरयानं ओढायचा हत्ती, वगैरे तिच्यापुढे आणून टाकते. ही अस्मी २ वर्षांचीच आहे आणि तशी खूपच शांत आहे. या दोघींचा संवादही अगदी 'पाहण्याजोगा' असतो. दोघीही काही मोजकेच शब्द आणि बाकी त्यांच्या अगम्य भाषेत काहीतरी बडबडत असतात.
"अंबी .. घे ..घे.. " कृष्णा.
"कुतना .. ब (बस)" अस्मी.
"च ..फू.." कृष्णा. (बहुतेक चल फूल दाखवते असं असावं)
अस्मी काही उठत नाही .. कृष्णा तिला हात धरून उठवायला जाते. अस्मीला वाटतं की ही आपल्याला मारतीये. ती रडायला लागते. "मम्मी ....."
कृष्णा मला सांगयला येते. "आंबी ऊं..."
मग रडारडीची कारणं शोधून शांतता प्रस्थापीत करणं, दोघींना वाटीत खाऊ देउन एकाजागी बसवणं वगैरे पार पडतं. कृष्णा पट्कन आपल्या वाटीतला थोडा खाऊ खाऊन, बराचसा सांडून पसरवते आणि मग अस्मीच्या वाटीत हात घालून तिचा खाऊ खायला लागते. आत मात्र अस्मी खूपच वैतागलेली .. रडवेली. कृष्णाच्या मते तिनं फारसं काही केलेलंच नसतं. त्यामुळे ती निवांतपणे आपल्या मैत्रीणीकडे पाहात बसते. मी जरा तिला 'सॉरी' म्हण. बघ तुझी मैत्रीण रडतीये ना. वगैरे संस्कार करायचा व्यर्थ प्रयत्न करते.

एव्हाना तिच्यामागे धावून माझा जीव पार कंटाळलेला असतो. घराची अवस्था तर अगदी पाहण्याजोगी असते. घरभर पुस्तकं, खेळणी, कांदे-बटाटे, स्केच पेन्स, खायला दिलेले मुरमुरे, पाणी वगैरे इतस्तत: पसरलेलं असतं. एखाद दोन देव परत टेरेस मध्ये गेलेले असतात. टेरेस मधल्या झाडांची पानं, फुलं घरात आलेली असतात. एका बाजूला T.V. तर दुसरया बाजूला टेपवर ढणाढणा बडबड-गीतं वाजत असतात. मी अगदी थकून या पसारयाकडे पाहात राहते. आपोआपच डोळे मिटतात. जाग येते तर माझी चिमणी लेक आपल्या चिमण्या हातांनी माझ्या डोक्यावर जोरजोरात थोपटत म्हणत असते...गाउ..गाउ...


- सोनाली सुहास बेंद्रे 

4 comments:

Nandan said...

Lekh surekh aahe, atishay aavadla

Tulip said...

Excellent blog!! Yu have got a very sensitive mind and beautiful language. keep posting!

paamar said...

Hi Sonali, "लिहायचं म्हणून..." 'ब्लॊग उघडून एकदाचं जमवलंस', ते खूप छान झालं :) चारही लेख अतिशय सुरेख आणि थेट 'पोटातून ओठावर' आले आहेत, बहिणाबाईंच्या ओव्यांसारखे ! वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचायला तुझ्या भावनांना तू सुंदर लेखनशैलीचा राजमार्ग दिला आहेस. असेच सुंदर लेख लिहित रहा...

hemant_surat said...

घरातला पसारा आता हवाहवासा वाटू लागलाय
मुलीचं खेळणं आता पटू लागलंय
उगाचच स्वछ्छता हवी मी विसरू लागलोय
माझ्या मुलीला मी आता हवाहवासा वाटू लागलोय
हेमंत पाटील