Sunday, September 17, 2006

आक्कात्ती

आज तू नसलेलं तुझंच घर मी आतबाहेर पाहिलं,
आणि परत एकदा जाणवलं...की आता तू नाहीस, परतून येणारही नाहीस.
काही व्यक्ती, काही जागा, त्यांचं आपल्यात असणं,
का आपण त्यांच्यात जगणं, हे इतकं सवयीचं असतं,
की रिकाम्या जागा मनास पटतंच नाहीत
आणि त्या कोणी भराव्यात असं वाटतही नाही.

खरंतर आता आम्ही लहान नाही...
आमच्या मुलांची पणजी होऊन तृप्त झालेल्या तुझ्या आठवणी मात्र खूप जुन्या...
सोमवारातल्या घरात, मधल्या खोलीतल्या, पाटीवरच्या गणितांच्या आणि तुझ्या हातातल्या पट्टीच्या!
मग भाईची आणि माझी धडपड...गणितं सुटायला हवीत. कारण समोर हातात पट्टी धरलेली तू ... आमची आजी!
मग एक दोन पट्ट्या आणि पाटी भरून गणितं झाली की कळवळलेली तू हातावर ५० पैसे दयायचीस आणि मी आणि भाई पार अपोलो टॉकीजच्या कुल्फ़ीवाल्याकडं धूम ठोकायचो.
गणपतीत तर तुला कोण हौस. ढीगभर नातवंडं गोळा करायची, गणपती दाखवण्याची आणि खाऊ-पिऊ घालण्याची.
खरंतर तुला सगळंच फिरून पाहण्याची, उपभोगण्याची फार आवड. आम्हा कॉलेजात जाणारया नातींना तू नेहमी
म्हणायचीस...जरा मलापण न्या गं तुळशीबागेत. नवीन पध्द्त्तीच्या टिकल्या, माळा, पाहायला, फिरायला.
पण आम्ही आमच्याच तालात...धुंदीत!
कधी म्हणायचीस, अगं आवरा जरा...पावडर कुंकू करावं...मुलीच्या जातीनं कसं नीट-नेटकं राहावं.
हे काय राहाणं? केसांना तेलाचा हात नाही...फ़िरतात गावभर तशाच. जरा ये एक दिवस,खसखसून न्हायला घालते.

दिवाळी आली की तुझी कोण गडबड. माझ्या दारात रांगोळी काढा गं...रंग भरा गं...
दारात खुर्ची टाकून पाहात बसायचीस. पण आम्ही हळूच सटकायचो...काहीतरी थातूर-मातूर कारणं काढून.
मग बोलणी...काय पोरी आहेत...आगाऊ नुस्त्या...जरा चार बोटं काढतील तर ... पण नाही!
हे ऐकायला आम्ही जागेवर तर हवं!
पण हेच नमस्काराला मात्र पुढे...हात पसरून! तेव्हा मात्र हातावर पैसे ठेवणारी, कानशिलावर मायेची बोटं मोडणारी, आणि आवर्जून सगळ्यांची, अगदी घरादारासकट द्र्ष्ट काढणारी....ती तूच...आमची आजी.

... पण आताशा फार थकली होतीस गं.
आम्हा सर्वांची लग्नं, संसार, मुलंबाळं, आमच्या तारुण्याच्या जोमात तुमची झपाट्यानं सुरकुतणारी पिढी आम्हाला 'दिसायची' तर खरं...पण 'लक्ष' दयायला वेळ नाही व्हायचा.
आम्ही आमच्यातच मग्न. आमचा जॉब, आमची कामं, आमची घरं ... परदेश वारया...
तुला मात्र कोण अभिमान...नातवंडांचा, सुना-जावयांचा. येणारया-जाणारयाला कौतुकानं सांगायचीस...फारिनला जाऊन आलीये. आणि मग कोपरयात घेऊन मला हळूच विचारायचीस ... कागं, पगार तर बरा मिळतो ना...?

संध्याकाळ झाली की तू थांबत-थांबत का होईना २ जिने चढणार, आणि पणतवंडांच्यात येऊन बसणार. भेटलं की ओरडणार, भेटायला येऊ नका...आम्ही वर गेलो की मग या!!
पण आमच्या व्यापात आम्ही गर्क. तू मात्र परत परत म्हणायचीस ... अगं भेटा गं. जरा आलं की ५ मिनिटं तरी.
मग आम्ही कधीतरी ५ मिनिटं तोंड दाखवायला यायचो. म्हणायचीस, बास आता... जागा रिकामी करायला हवी ... तर आम्ही हसण्यावारी न्यायचो.

पण दवाखान्यात तुला पाहिलं आणि मनचं हललं गं! कमालीचं थकलेलं शरीर आणि जाणिवेच्या अलीकडं-पलीकडं घोटाळणारं तुझं मन!
चिऊ-काऊच्या घासासारखं बोलण्यात गुंगवून तुला बळेच भरवताना जाणवली ती तुझी अनिच्छा, तुझ्या वेदना, आणि एक अलिप्तता...?

... आणि मग २-३ दिवसात समजलं की तू नाहीस.

दु:खाच्याहीवर पश्चात्तापाची भावना मन व्यापून गेली.

आज तू नसलेल्या तुझ्या घरात प्रत्येक गोष्ट पोरकी वाटली.
तुझी पुस्तकं ... तुझे देव... रांगेत मांडलेले तुझे जिवा-भावाचे पितळी डबे आणि तुला मीच रंगवून दिलेला मोठा श्रीकृष्णही!

तुझ्या नावाच्या दिव्याजवळ तास-दोन तास बसताना वाटलं ... हा वेळ तेव्हा झाला असता तर ...? कारण तुला आमचा फक्त वेळच तर हवा होता!!


- सोनाली सुहास बेंद्रे 

6 comments:

Abhijit Bathe said...

ultimate - keep it up.

आदित्य said...

ह्या सगळ्या आठवणी नेमक्या मांडल्या आहेस. ज्या कोणाची आपल्या आजी-आजोबांशी खूप अंतरीक जवळीक असते त्याला ह्यातल्या भावनांशी नक्कीच रेझोनन्स जाणवेल.'छान' 'अप्रतिम' असे शब्द ह्या लिहिलेल्या आठवणींपेक्षा खरंच खूप छोटे आहेत.

Sonali said...

हे खरंतर पश्चात्तापातून लिहिलेलं लिखाण आहे. मागीला पिढीला वेळ हा त्यांना गरज असते तेव्हाच दयायला हवा... आपली कामं जरा बाजूला ठेवून...आणि आपला वेग कमी करून.
-सोनाली

Monsieur K said...

अगदी खरं म्हणतेस! आजी-आजोबा आपण लहान असताना आपले इतके लाड करतात, आपल्याला संभाळुन घेतात. आपण मोठे झालो की आपल्याला ह्या सर्वाचा विसर पडतो, आपण आपल्याच रुटीन मध्ये एकदम व्यस्त होऊन जातो. गंमत म्हणजे आजी-आजोबांना आपला थोडासा वेळ हवा असतो, आणि वेळच ती गोष्ट आहे जी आपण त्यांना देऊ शकत नाही. जगजीत सिंहच्या एका गज़ल मधल्या काही ओळी आठवतात,
"एक आह भरी होगी,
हमने न सुनी होगी,
जाते जाते तुमने,
आवाज़ तो दी होगी,
हर वक्‍त यही है गम,
उस वक्‍त कहा थे हम..."

मी पण कदाचीत पश्चात्तापातुनच हे सगळं लिहिलं आहे.. तुला दु:खावलं असेल, तर क्षमस्व.

Akira said...

Sonali..ha lekh wachtanna manacha ek kopra mala aparadhipanachi janeev karun detoy...kharach kitti gurphatalele asto apan awatahamadhech!

Ravi said...

me pan somwaratlach, madhali kholi, apollo talkies wagere wagere madhe thoda firun alo aaj... ha sadharan asach anubhav mazapan... surekh watala wachun...