Monday, May 10, 2010

फडणीसवाडा


त्या मोकळ्या जागेच्या एका बाजूला फडणीसवाडा, तर दुसरया बाजूला मातीची जुनी दोन घरं होती. कुठलं घर असेल बरं यातलं? मला सांगितलंय त्याप्रमाणे इथेच असायला हवं.
मी माझ्या वडिलांच्या जन्मगावात त्यांच्या बालपणीच्या खूणा शोधत होते. खूप उत्साह, एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती. सकाळच्या साडेसहा-सातला आता विचारावं तरी कोणाला? समोरच्या मातीच्या घराशी झाडत असलेली एक बाई विचारावं तर लगेच आतही गेली. बाजूच्या झाडाची फुलं तोडत असलेल्या एका वृद्दालाच मग आजोबांच्या नावाचा संदर्भ सांगितला

- माहितीये का हो तुम्हाला त्यांचं घर? इथेच कुठे होतं असं कळलं!
डोळे बारीक करून त्यांनी माझ्याकडे पाहिलं
- ते संघवाले ना? माहिती की, ते तिथंच तर होतं. पण आता जे घर दिसतंय ते आधिचं त्यांचं पाडून बांधलेलं.
मला वाईटच वाटलं घर बघायला नाही मिळालं म्हणून! पण म्हणलं जागा तर कळली.
- आधी आम्ही इथेच खेळायचो, शाखा भरायची याच मोकळ्या जागेत. माणूस केवळ देशसेवेला वाहिलेला, सगळ्यांना मदत करणारा.
भरभरून बोलताना अचानक थांबले, कपाळाशी आडवा हात धरून म्हणाले
- अगं पण तू कोण? विचारत आलीस बरी ती!
- मी नात त्यांची.
- होय! छाप बाकी शेम आहे हां!
परिचयाचं हे वाक्य ऐकून मला हसूच आलं.
- तुम्ही कुठे राहायला?
- हा बाजूचा आहे ना, तो फडणीसवाडा. आमचाच तो! समोरच्या त्या मोठया, जुन्या-पुराण्या वाडयाकडे बोट दाखवून ते म्हणाले.
- १५० वर्षांच्याही वर होऊन गेलीत. आमचे पूर्वज इथल्या महाराजांच्या पदरी होते. त्यांनीच हा वाडा बांधून दिला. तो लांबचा दगडी हौद आहे ना तिथपावॆतॊ आमचा वाडा पसरलाय. हा वड पाहिलास? आम्हा कोणालाच माहीत नाही तो किती जुना आहे.
आपल्या पारंब्यांचा भार, कोण जाणे कधीपासून, कडेच्या ओढ्यातून सोडून बसलेला तो प्रचंड धीर-गंभीर वड, एखादा पूर्वजच जणू.
वाडयाचा तो भला मोठा लाकडी दरवाजा, त्याच्या त्या कधीकाळच्या चमकत्या पण आता काळवंडलेल्या पितळी कडया.
- आता हा दरवाजा बंदच असतो. आधीच्या आमच्या एका पिढीतल्या मुंजीत म्हणे या दरवाजातून हत्ती आत आणला होता. आता कोण यायचंय हो! हे छोटं दार वापरात असलं तरी पुरे. आणि या बघ इथे या दोन देवडया. पूर्वी आमचे पूर्वज महाराजांच्या पदरी असताना इथे भालदार-चोपदार असायचे.
वाडयातून आत आल्या-आल्या डोळ्यात भरत होतं ते त्याचं प्रशस्तपण, खानदानी सौंदर्य! मोठया काळ्या दगडांचं, ते पाचखणी आणि ३ मजली बांधकाम, मध्ये मोठा चौक, चार पायरया चढल्यावर मोठी ऒटी, तीवरचा कडीपाटाचा प्रशस्त झोका, एकीतून दूसरया खोलीला जोडणारया, गत-समृद्धीच्या अशा कितीतरी खुणा. ओट्यानंतर मधलं घर, डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही इतकी अंधारी बाळंतिणीची खोली, भलं-मोठ्ठं अंगण. अंगणाच्या बाजूलाच प्रशस्त न्हाणी. आपल्या आजच्या "बाथरूम" च्या ४ पट तरी मोठी. अंगणाच्या भिंतीच्या कडेंनी पाणी वाहून जायची दगडी पन्हळींची व्यवस्था. सगळ्या वाडयाचं सांडपाणी त्यातून लांबच्या ओढ्यात सोडण्याची अगदी विचारपूर्वक सोय केलेली.
पण आता सगळ्यावरच एक जुनाट थर साठलेला!
- काका, काय सुरेख झाडं लावलीयेत हो!
- अगं फार आवड आम्हाला, आधी तर खूप होती. आताशा जमत नाही नीट करायला. एक एक करून गेली मग बरीचशी.
मागच्या अंगणाच्या कडेने ओळीनं पण आता बंद असलेल्या खोल्या होत्या. बरीचशी पडझड पण झालेली.
- आता कोणीच नाही या खोल्यातून. आधी कसं भरलं घर होतं अगदी. आता या पडक्या खोल्यांची दुरुस्ती तरी किती करणार आणि इथे राहणार तरी कोण?
बाहेरच्या ओट्यावर खूप आधी एक कारंजं होतं. आता लिंपलेलं ते. ते कारंजं पण एक कमाल कल्पना होती. वाडयाच्या पहिल्या मजल्यावर एक पितळी भांडं होतं, त्यात पाणी टाकलं की ओट्यावरच्या या कारंज्यातून फवारॆ याय़चॆ.
बाहेर ओट्यावर जुनी चित्रं, फोटो लावले होते. त्या चित्रातले रंग अजूनही ताजे वाटत होते. अतिशय जुन्या काळातले, त्यावेळच्या वेषातले ते फोटो एका वेगळ्याच विश्वात नेत होते. आजोबा फोटोतल्या व्यक्ती, त्यावेळ्ची परिस्थिती याबद्दल सांगताना अगदी रंगून गेले होते. त्यांच्या पूर्वजांची, फोटो नव्हते तेव्हांची चित्रे, आणि त्यांच्या आई-वडिल, आजी-आजोबांचे फोटो, त्यांचा स्वत:चा मुंजीतला फोटो...
- हा बघ मी, माझा भाऊ आणि ही माझी मावशी. बालविधवा आहे. आमच्या आई-वडिलांनी तिला नंतरचे हाल टाळायला म्हणून स्वत:बरोबर आणलं, शिकवलं. अनेक सन्मान घेत मुख्याध्यापक म्हणून मावशी निवृत्त झाली. आत्ता मागे होती ना तीच ती. ८५ ची आहे आता.
रमून गेले होते ते अगदी.
- पण आता काय आहे की कोणालाच हे फोटो घरी नको असतात. मग टाकतात आणून इकडे. आम्ही म्हातारा-म्हातारी बसलोय संभाळत हॆ सगळं! तो वरचा पडका मजला पाहिलास? वापरात राहावं म्हणून एकांना शिकवणीचे वर्ग चालवायला दिला. कसलं काय... वाट लावली सगळी. बघ, बाकडी पडलीत अजून. सगळी धूळ आणि कबाडी.
- मग काही दुरुस्ती?
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच निश्वासून ते म्हणाले...
- भाऊबंदकी... सगळीजणं आता पांगली, काम-उद्योगासाठी पुण्या-मुंबईककडे गेली, ती तिकडेच स्थायीक झाली. आता कोणी या वाड्याच्या दुरुस्तीला पैसे दयायला तयार नाही. त्यांचंही बरोबर आहे म्हणा. म्हणतात, तुम्ही तरी काय करताय, विका आता हा पडका वाडा, जागा डॆवलप करा, आमचा वाटा आम्हाला द्या. आपण सगळेच मोकळे. बरं जुन्या जतनाला सरकारी मदतही नाही. वाईट वाटतं, हे सगळं पाडायचं, आपल्याच हातांनी मिटवायचं म्हणजे. नवं बांधून पैसा मिळेल, धडधाकट घरही मिळेल, पण ही वाडयाची शान त्यात असणार आहे का? पण मग मी तरी किती तगवणार हे सगळं? मला एकट्याला नाही जमत. इच्छा लाख आहे पण तेवढी शक्ती नाही, सत्ता नाही आणि पैसाही नाही. आता राहतो तो भाग तगवलाय लाकडी पटट्या ठोकून, पण ते तरी किती टिकणार आहे असं? तात्पुरती डागडूजी आपली.
१५० वर्षांहून जास्त काळाचा भार घेउन उभ्या असलेल्या त्या लाकडी तुळया खरंच खूप वाकल्या होत्या.
- हे फ़िल्मवाले शुटींगला वाडा मागतात, वाटलं तेवढंच उत्पन्न. पण ते हवा तेवढाच भाग दुरुस्त करतात. हा आमचा एवढा सुरेख पितळी फुलांचा झोका ... त्याचा तेवढा शुटींगमधे दिसणारा कोपराच पॊलिश करतात. काम झालं, पसारा टाकला की गेले. मग आता मीपण त्या लोकांना वाडा देतच नाही शुटींगला.
वाडा दाखवण्य़ाचा त्यांचा उत्साह आता थंडावला होता. मलाही काय बोलावं सुचॆना. आजी दाराशी येऊन थांबल्या होत्या, चहा-नाश्त्याचा आग्रह करायला.
- साखरच दया फक्त हातावर थोडी,
मी हसून म्हणले.
आजींनी कुंकू लावलं. मी दोघांनाही वाकून नमस्कार केला.
आजोबा म्हणाले - तुमच्या पिढीतलं कोणी अजून विचारतंय, माझं या वाडयाचं कौतुक एवढं ऐकून घेतंय, बरं वाटलं. नाहीतर कोण येतंय इथे!
मघाच्या लाकडी दारापर्यन्त सोडायला आले ते.
- ये हो परत. पण तेव्हा इथे हा वाडा नसेलही कदाचित!


- सोनाली सुहास बेंद्रे 

1 comment:

शिनु said...

किती छान. अजून सविस्तर लिहायला हवं होतं. जुन्या वास्तूत गेलं की असं वाटतं या वास्तूनं कोणते कोणते दिवस पाहिले असतील. आपल्याला माहितिही नसलेल्या पूर्वजांचे हात इथल्या भिंतीवरून फ़िरले असतील. तो स्पर्शाचा ओलावा तिथे असेल तर आपलं एक कनेक्शन जाणवतं. मला अशा जुन्या वाड्यांना भेट द्यायला प्रचंड आवडतं आणि म्हणून जुने वाडे पाडून इमारती उठविणार्‍यांबद्दल एक आकसही आहे.