Friday, January 27, 2006

रविवार ... मी .. आणि .. माझी लेक

रविवार. घरात आम्ही दोघीच .. मी आणि कृष्णा. कृष्णा म्हणजे माझी दीड वर्षांची लेक.
तर रविवारी पहटेच्या साखरझोपेत असताना मला जाणवतं की कोणीतरी गपकन माझ्या पोटावर बसलयं. अर्ध्या गुंगीत, घाबरून मी डोळे उघडते तर ही बया माझ्या पोटावर बसून घोडा-घोडा खेळत असते. घड्याळात पाहावं तर पहाटेचे ६-३० !
रविवारची सुरुवात ही अशी होते. आईला सुट्टी म्हणजे आपला पुरेपूर सहवास हा तिला लाभलाच पाहिजे असा जणू तिचा पणच असतो.

तिचा बाबा ऑफ़िसला गेल्यावर तर मला ही अगदीच एकाकी, विनारसद लढत वाटू लागते.
उजाडल्यापासून पायाला चक्रं बांधल्यासारखी तिची घरभर फिरती चालू असते. कांद्या-बटाट्याची टोपली उचकून घरभर कांदे पसरवणं, बाथरूममध्ये जाउन अंगावर पाणी ओतून घेणं, वर्तमानपत्रं, भिंती इ. वर स्केचपेन-पेन्सिल यांनी गहन गिरगोट्या ओढणं अशी तिची एक ना अनेक महत्त्वाची कामं चालू असतात.

आमच्या देवांना पूजेचा बहुमान हा फक्त शनिवार-रविवारीच मिळतो. आता पूजा करावी म्हणून मी देवघरापाशी जाते आणि बघते तर काय .. देव गायब! मला कळत नाही देव कुठे गेले? आणि मग अचानक लक्षात येतं की कृष्णाचा बराच वेळ झाला आवाज नाहीये. बाथरूममधून पाण्याचा आवाज येतो. जाउन बघते तर काय .. तांब्यानं देवांवर अभिषेक चालू असतो.
मला पाहून आधी ती जरा दचकते. आता ही आई आपल्यावर ओरडणार अशा खात्रीनं क्षणभर बघते आणि मग लगेच आपलं ते प्रोफेशनल गोड हसू चेहरयावर आणून मला म्हणते, 'बाप्पा .. मंबो'! म्हणजे बाप्पाची शंभो चालू आहे.
आता काय बोलणार? तो सर्व पसारा आवरून एकदाची बाप्पाची पूजा आटपते.

आता मोठ्ठा कार्यक्रम ... कृष्णाचं जेवण.
एका ताटात वरण-भात, दोन रिकाम्या वाट्या, २-३ चमचे, ३-४ चित्रांची पुस्तकं घेऊन कार्यक्रम सुरू होतो. त्याच्याबरोबरीनं खाल्लं नाहीतर भिती दाखावायला बुवा, गुरखा, डॉक्टर, टुचू वगैरे मदतीला असतातच.
५-६ घास खाऊन झाले की हातात भात घेउन तो जमिनीवर सारवणं, केस उपटून टकल्या केलेल्या आणि लोळवून मळलेल्या बाहुलीला जबरदस्ती भरवणं, आदी चालू होतं. एका बाजूनं माझी लेकी बोले, सूने लागे बडबड चालूच असते.
"वेडी बाहूली .. खात नाही .. वेडी आहे ना?"
"हूं ..." कृष्णा.
"थांब तिला बुवाकडेच देते. देउ का?"
"हूं ..." कृष्णा.
"टुचू देउ का तिला? बोलवू डॉक्टर काकांना?"
"हूं ..." कृष्णा.
सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. पुढचा अर्धा तास कृष्णा, बाहुली आणि फरशी यांच्या सफाईत जातो.
तोवर ही इकडे बाहुलीला ओरडत असते.
"वेई ..हां ..!"
"टुचू .. हां ..!"
जे काही थोडंफार बोलता येतं तेच ती माझी नक्कल करत बाहुलीला सुनावत राहते.
बाहुलीनं आता ऐकलं अशी खात्री पटल्यावर मग पुढच्या उद्योगाचा शोध सुरू होतो.

एवढ्यात आमच्या शेजारची कृष्णाची मैत्रीण 'अस्मी' खेळायला येते. कृष्णा आपली मळकी, टकली बाहुली सोडून बाकी पुस्तकं, दोरयानं ओढायचा हत्ती, वगैरे तिच्यापुढे आणून टाकते. ही अस्मी २ वर्षांचीच आहे आणि तशी खूपच शांत आहे. या दोघींचा संवादही अगदी 'पाहण्याजोगा' असतो. दोघीही काही मोजकेच शब्द आणि बाकी त्यांच्या अगम्य भाषेत काहीतरी बडबडत असतात.
"अंबी .. घे ..घे.. " कृष्णा.
"कुतना .. ब (बस)" अस्मी.
"च ..फू.." कृष्णा. (बहुतेक चल फूल दाखवते असं असावं)
अस्मी काही उठत नाही .. कृष्णा तिला हात धरून उठवायला जाते. अस्मीला वाटतं की ही आपल्याला मारतीये. ती रडायला लागते. "मम्मी ....."
कृष्णा मला सांगयला येते. "आंबी ऊं..."
मग रडारडीची कारणं शोधून शांतता प्रस्थापीत करणं, दोघींना वाटीत खाऊ देउन एकाजागी बसवणं वगैरे पार पडतं. कृष्णा पट्कन आपल्या वाटीतला थोडा खाऊ खाऊन, बराचसा सांडून पसरवते आणि मग अस्मीच्या वाटीत हात घालून तिचा खाऊ खायला लागते. आत मात्र अस्मी खूपच वैतागलेली .. रडवेली. कृष्णाच्या मते तिनं फारसं काही केलेलंच नसतं. त्यामुळे ती निवांतपणे आपल्या मैत्रीणीकडे पाहात बसते. मी जरा तिला 'सॉरी' म्हण. बघ तुझी मैत्रीण रडतीये ना. वगैरे संस्कार करायचा व्यर्थ प्रयत्न करते.

एव्हाना तिच्यामागे धावून माझा जीव पार कंटाळलेला असतो. घराची अवस्था तर अगदी पाहण्याजोगी असते. घरभर पुस्तकं, खेळणी, कांदे-बटाटे, स्केच पेन्स, खायला दिलेले मुरमुरे, पाणी वगैरे इतस्तत: पसरलेलं असतं. एखाद दोन देव परत टेरेस मध्ये गेलेले असतात. टेरेस मधल्या झाडांची पानं, फुलं घरात आलेली असतात. एका बाजूला T.V. तर दुसरया बाजूला टेपवर ढणाढणा बडबड-गीतं वाजत असतात. मी अगदी थकून या पसारयाकडे पाहात राहते. आपोआपच डोळे मिटतात. जाग येते तर माझी चिमणी लेक आपल्या चिमण्या हातांनी माझ्या डोक्यावर जोरजोरात थोपटत म्हणत असते...गाउ..गाउ...


- सोनाली सुहास बेंद्रे 

Monday, January 23, 2006

नवनिर्माण

अचानक वेदना सुरु होतात आणि कुठेतरी मनात जाणवतं की हेच ते. कदाचित तो क्षण आता कुठेतरी वळणावरच आहे.
दवाखाना .. ते वातावरण .. पण एक कोणतीतरी भिंत मध्ये उभी असल्यासारखं ते माझ्या मनापर्यंत पोहोचतच नाही. छातीतली धडधड मधेच वाढते .. कमी होते. आतलं ते हलणारं 'जीवन' प्रत्येक वेणेबरोबर स्वत:चं अस्तित्त्व सिध्द करतंय.
जसं काही आतून आवाज उमटतोय .. येऊ का?

सारा दिवस आणि उभी रात्र .. अशीच सरते वाट पाहण्यात.
सगळं जग झोपलेलं, शांत आणि नि:स्तब्ध. माझ्याबरोबर आलेली माझी माणसंही शांत झोपेच्या अधीन. मी मात्र टक्क जागी. रात्र वाढेल तसा वेदनेचा उत्सव अजूनच वाढतोय. मी आणि माझ्यातलं ते जीवन .. आमच्या दोघात वेदनेची एक लय बांधली जातीये. रात्रीच्या त्या नीरव शांततेत आपण दोघंही वाट बघतोय .. एकमेकांना सांगतोय की थांब, आता थोडक्यावरच आहे.

त्या लयीतच उजाडतं. सकाळ होते. माझी माणसं विचारतात, 'बरी आहेस ना? झोप लागली का?' त्यांना काय सांगणार? मी आणि तू .. आपला रात्रीतला तो संवाद .. आपण एकत्र भोगतोय त्या वेदना. त्यांना सांगून त्या कळाव्यात तरी कशा?
मी हसून म्हणते, 'बरीये.' तू पण आतून तेच म्हणलंस का?

दिवस चढेल तसा वेदनेचा एक अंगार उसळायला लागतो. एक वाढती आगच जशी काही. असं वाटतं की शरीर जसं काही पेटलयं. एक गरम वाफ अंग भाजून काढतीये. ही वाढती लय आता सोसत नाहीये. तुला होणारा त्रासही मला जाणवतोय. मला जाणवणारी .. पिळून काढणारी प्रत्येक वेणा तुलाही जशी पुढे ढकलतीये. तुझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आता जवळ येतोय.

आता मात्र मला थोड रागही येतोय. हा सर्व त्रास मला तुझ्यामुळे होतोय हे तुला माहितीये का? भिंतींवर हात आपटून मी तो व्यक्तही करतीये. मला खूप मोठ्यांदा ओरडावंसं वाटतंय. पण माझा सुस्कृंतपणा आड येतोय.

माझी माणसं आता काळजीत. कसं होणार हिचं? सगळं नीट होईल ना? पण मी मात्र आता त्या लयीशी समरस झालीये .. आणि तू पण.
माझा कण न कण .. माझा श्वास आणि मन सारंच एका झोक्यावर आहे. एकदा तो झोका असा उंच जातो की श्वास पुरत नाही. मन, संवेदना बधीरतात.
त्या हिंदोळ्यावर झुलताना मी सारं विसरलीये.
आजूबाजूचं जग .. त्यातली माणसं .. मी .. माझं शरीर .. सारं काही.
जाणवतंय ते फक्त तुझं अस्तित्त्व .. तुझा आकार .. तुझा वाढता जोर.
वरवर जाणारा उंच झोका ... एवढा उंच .. उंच.
माझे पाय जमिनीवरून कधीचेच सुटलेत.
माझं भान हरपलंय.
जगाशी संपर्क तुटलाय.
तुझ्या - माझ्यातली वेदनेची ती लय आता सम गाठतीये.

.......

थकलेलं शरीर .. पण उत्सुक मन .. तुला पाहायला, जाणून घ्यायला.
तू माझ्या हातात आणि मला ओळख पटते.
तू डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहातेस .. निरखून घेतेस.
तुलाही ओळख पटलीये बहुतेक. कारण तू परत डोळे मिटून निवांत होतेस. विश्वासून माझ्या कुशीत गुरफटून घेतेस.
सरल्या प्रवासाच्या वेदना .. त्या वेदनांच्या खुणा. ना तुझ्यावर .. ना माझ्यावर.
आपण दोघी एकमेकींतच गर्क. परस्परातले ओळखीचे धागे बांधण्यात हरवलेल्या.

माझी लोकं मात्र म्हणतात, सुटली बिचारी एकदाची, थकली असेल. शेवटी जीवातनं जीव बाहेर यायचा म्हणजे...


- सोनाली सुहास बेंद्रे 

Friday, January 13, 2006

मिनॉपॉलिसच्या विमान फलाटावर

आत्ता मी मिनॉपॉलिसच्या विमानतळावर गेट नं. १० वर बसलेली आहे.
गेट म्हणजे थोडक्यात काय तर फलाट. माझं मिनॉपॉलिसहून बाल्टिमोरला जायचं विमान इथे लागणार.
एस टी स्टँडवर बसणं आणि विमानतळावर बसणं यात मूळ स्तरावर काहीही फरक नाही. वातावरण बदलतं इतकंच. बाकी दोन्हीकडे लोकांचे हेतू सारखेच. एकीकडून दुसरीकडे जाणे. आणि मधला वेळ हा असा फलाटावर बसून घालवणं..म्हणजे वाचन, निरीक्षण, खाणं-पिणं, वगैरे.

पलीकडेच्या फलाटावर असणारी गर्दी आपल्या विमानाची वाट पाहात होती. काहीजण वाचत, काही कॉफ़ी पीत, तर काही..काही न करताच गेट उघडण्याची वाट पाहात होते. त्यातलं एक छोटंसं बाळ मजेत इकडे-तिकडे रांगत होतं. त्याची आई सारखी त्याला उचलून आणत होती...प्रेमानं दटावत होती. पण बाळ भारी खट्याळ...आईचा डोळा चुकवून ते आपलं वेगळ्याच दिशेनं परत रांगत सुटायचं.
त्यांच्या समोरच्याच रांगेत एक वयस्कर बाई बसल्या होत्या. बहुधा एकट्याच प्रवास करत असाव्यात. आजी मोठ्या रसिक दिसत होत्या. छान कलर केलेले केस..मेक-अप..गळ्यात मोत्यांची माळ..मोठ्या फुलांचं कानातलं..आणि हो..त्यांच्या त्या झग्याला शोभेल अशाच मोठी फुलं असणारया त्यांच्या चपला.
आता बाळानं मोहोरा इकडे वळवला, तो थेट आजीबाईंच्या चपलांकडे.
चपलांवरची ती मोठी रंगीत फुलं तोडावीत असं काहीतरी त्याच्या मनात असावं. छोटंसं पुस्तक वाचण्यात रमलेल्या आजी एकदम दचकल्या. घाबरून पायाकडं पाहतात तर काय..हे चिमणं मजेत त्यांच्या चपलांवरचं फूल धरून खेचत होतं. आजी झट्कन खाली वाकल्या. त्यांनी बोळकं पसरून हसणारया त्या बाळाला उचलून घेतलं. तेवढ्यात बाळाची आई आली. कौतुकानं आपल्या बाळाला दटावत आजींना sorry वगैरे म्हणाली. अगं ठीक आहे..चालायचंच..लहान आहे..इंग्रजीत आजी म्हणाल्या असाव्यात. एव्हाना बाळ आजीच्या मांडीत बसून त्यांच्या पर्सशी..मोठ्या फुलांच्या कानातल्याशी खेळत होतं. त्याला त्या रंगीत आजी भलत्याच आवडलेल्या दिसत होत्या. आजी मग काहीसं गाणं म्हणू लागल्या..आपल्या चिऊ-काऊ सारखं. माझा आपला एक अंदाज. बाळाची आई अगदी प्रेमानं बाळाकडं पाहात होती.
फार मोहक द्रुश्य होतं ते. मला वाटतं..वात्सल्याची भावना ही इथून-तिथून सारखीच असावी.

त्यांच्या विमानाचं गेट उघडलं. बाळाच्या आईनं बाळाचा पसारा आवरला. त्या दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला.
आजींनी आपल्या कानातली ती मोठाली फुलं काढून बाळाला दिली. बाळ खूश.

इकडे आमच्या फलाटाकडे मगाचपासून एक बाई आपल्या मुलीला सारखं खेकसत होत्या. ती ५-६ वर्षांची मुलगी सारखी खुरडत खुरडत इकडे-तिकडे जायला बघत होती. आणि तिची आई ओरडत, खेकसत, तिला ओढून, खरंतर फरपटत परत जागेवर आणत होती. त्या मुलीला ते आवडत नसावं. मोठ्या आवाजात ती आपला निषेध नोंदवत होती. विचित्र हातवारे करून आईला कहीसं सांगू पाहात होती. बराच वेळ हे चालू होतं. ती आई बिचारी लोकाच्या नजरा टाळत, मुलीला जागेवर बसवायला बघत होती.
मधेच समोरच्या रांगेतल्या खुर्च्यांकडे ती मुलगी गेली. तिथे एक तरुण मुलगा..पाठीला sack, पायाशी गिटार केस.. पुस्तकात तोंड खुपसून बसला होता. अजून एक बाई laptopवर काहीसं काम करत होत्या.
ही मुलगी आईचा डोळा चुकवून त्यांच्यापाशी गेली. laptopवर काम करणारया बाईंपाशी उभं राहून laptop कडे बोट दाखवून, तिच्या भसाड्या आवाजात त्यांना काहीसं सांगू लागली. तिला laptop पाहून खूप आनंद झाला असावा. तिच्या तोंडातून गळणारी लाळ बाईंच्या पायावर पडत होती. बाईंचं लक्ष वेधून घ्यायला ती त्यांचा स्कर्ट ओढू पाहात होती. कामात गर्क बाई दचकल्या..त्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं..आणि त्यांचा चेहरा एकदम बदलला. अतिशय किळसवाणी गोष्ट पाहिल्यासारखा चेहरा करून त्यांनी तिचा आपल्या गुडघ्यावरचा हात झटकला. ती बेसावध मुलगी जराशी हेलपाटली..घाबरली. तेवढ्यात तिची आई धावत आलीच. पडेल चेहरयानॆ, परत-परत माफी मागत राहिली. फरपटतच तिनं आपल्या मुलीला परत खुर्चीशी आणलं.
मुलगी तिच्या भसाड्या आवाजात किंचाळत होती..हात-पाय झाडत होती. आईच्या हातातून निसटून जायला पाहात होती. आई तिला सावरायचा प्रयत्न करत होती. तिचे कपडे नीट करत, तिच्या तोंडातून गळणारी लाळ पुसत होती. त्यांच्याकडेच पाहणारया आजूबाजूच्या माणसांची नजर चुकवायला बघत होती.

आधी राग..मग तिरस्कार..अगतिकता..आणि मग केवळ प्रेम. आईच्या चेहरयावरचे भाव झरझर बदलत होते.
एव्हाना स्वत: शांत होऊन, आईनं तिलाही शांत केलं होतं. एक मोठीशी बाहुली तिच्या हातात देऊन ती करुणेनं..प्रेमानं आपल्या मुलीकडं पाहात होती. ती मुलगी आपल्या त्याच भसाड्या आवाजात आईला काहीसं सांगत होती. त्या मायलेकी आता स्वत:च्याच विश्वात रमल्या होत्या.

ही एक आई..आणि मघाचीही आईच. हे आईचं प्रेम..आणि तेही तिचं प्रेमचं.
मला वाटतं..खरचं वात्सल्याची भावना ही इथून-तिथून सारखीच असावी.


- सोनाली सुहास बेंद्रे 

Saturday, January 07, 2006

चांभार

कामं आवरून परत निघताना असंच समोरच्या झाडाखाली लक्ष गेलं.
अंथरलेलं एक पोतं...एका छोटया पत्र्याच्या डब्यात बारक्या चूका...प्लास्टिकच्या फ़ुटक्या भांडयात पाणी...कुठे चामडयाचे २-४ तुकडे आणि चप्पल ठेवायचा तो चिरपरिचित लोखंडी फणा.
आणि एकदम लक्षात आलं की एवढयात आपण चांभार या व्यक्तीकडे गेलोच नाही.

किती महिने...वर्षं झाली काय माहीत?
पण चांभार या माणसाशी जसा संबंधंच उरलेला नाही.
परत त्या पोत्यावरच्या पसाऱ्याकडे आणि चप्पल तुटलेल्या गिऱ्हाइकांची वाट पाहणाऱ्या त्या चांभाराकडे पाहून कससंच वाटलं.

शेवटचं मी चांभाराकडे कधी बरं गेले होते...? काही नीट आठवत नाही.
आमच्या कॉलेजच्या रस्त्यावर एक म्हातारे चांभार आजोबा बसायचे. तेव्हा त्यांच्याकडे कधी-मधी मी जायची.
कुठे अंगठा तुटला...शिवण निघाली...१-२ रुपयात काम व्हायचं.
मला आठवतं..ते आजोबा अगदी मान-पाठ एक करून टाका घालायचे.
जाड काचेचा, धुळवटलेला..खिळखिळा झालेला त्यांचा तो चष्मा सारखा नाकावरून खाली घसरायचा..
आजोबा काहीसं पुटपुटत तो वर घ्यायचे...आणि मग थोडं जास्तच वाकायचे.
त्यांच्यामागच्या दोरीवर दोन-चार चपलांचे जोड टांगलेले असायचे.
कोणी कधी त्या चपला विकत तरी घेतल्या का कोण जाणे...

काम असू..नसू..त्यांची नजर आपली सतत खाली..लोकांच्या पायांकडं आणि चपलांकडं.

बरंच पुढं कधीतरी ते दिसेनासे झाले. ते ज्या भिंतीशी बसायचे त्या बँकेत मग मी विचारलं.
ते एक म्हातारे आजोबा..चांभार..इथे बसायचे..कुठे हो गेले?
तिथला शिपाई म्हणाला..ते म्हातारं होय? घालवलं त्याला.
बँकेची दुरुस्ती झाली..फ़ुडं थोडं वाढवलं..कुंड्या..नवा रंग अन काय काय.
मग त्यात घालवलं त्याला.

मला चांभार आजोबांच्या पागोट्याचा मळलेला, कधीतरी भडक गुलाबी असलेला रंग आत्ताही डोळ्यापुढे आला.

आता चप्पल तुटली की लगेच नवी घ्यायची. नाही...असे कितीतरी जोड..चपला..बूट..फ़्लोटर्स..कपाटात पडलेले असतात.
मग आधीची तुटलेली चप्पल दुरुस्त करायचा प्रश्नच येत नाही.
ती अडगळीत आणि मग पुढे कधीतरी भंगारातही जाते.
घरातले मागच्या पिढीतले मग म्हणतात...
तुम्हाला ना पैशाची किंमत नाही..काय बंदच तर तुटलाय ना.
कोपऱ्यावरून लावून आण..२-३ रुपयात काम होईल.


- सोनाली सुहास बेंद्रे 

Wednesday, January 04, 2006

लिहायचं म्हणून...

परत लिहायचं म्हणून... अशी वर्षे सरून गेली...
कागद पडले पिवळे...अन् लेखणी सुकून गेली...

आता लिहायचंच म्हणून किती संकल्पही केले
पण वेळ तरी कुठे असतो म्हणत सोडूनही दिले

वाचन..चिंतन..विचारमंथन..काय बरं करावं..
आता लिहायचं म्हणलं तर हे जमवायलाच हवं..

म्हणता म्हणता..करता करता..कुणीसं सुचवलं..
आणि "लिहायचं म्हणून..." ब्लॊग उघडून एकदाचं जमवलं...


- सोनाली सुहास बेंद्रे